आम्ही कुणाला छेडणार नाही, कुणी छेडलं तर सोडणार नाही : शेलार

लांजा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे अज्ञान उघड केले म्हणून एवढा मोठा थयथयाट केलात का? असा सवाल करीत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलाय. तसंच ‘हम किसी को छेडेंगे नहीं, कोई हमको छेड़ेगा तो उसको छोड़ेंगे नहीं’, असा इशाराही शेलार यांनी शिवसेनेला दिलाय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन-आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आज लांजा येथे संवाद सभा झाली यावेळी बोलताना आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक आणि शिवसेनेने केलेला तमाशा याचे खरे कारण काय होते? मुख्यमंत्र्यांचे अज्ञान राणें यांनी उघड केले म्हणून एवढा राग आला का? अशी प्रश्नांची सरबत्तीच शेलार यांनी यावेळी केलीय.
याच महिन्यात मंत्रालयासमोर सुभाष जाधव या शेतकऱ्यांने आत्महत्या केली. तर इंदापूरचे शिवाजी चितळकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या सभेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर पालघरमध्ये आदिवासी काळू पवार याने पाचशे रुपयाचे मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी कर्ज घेतले, त्या प्रकरणी छळ झाला म्हणून आत्महत्या केली. या घटनांतून राज्य सरकारविषयी असलेला असंतोष प्रकट होऊ लागला आहे. या घटनांवरून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी राणे यांना अटक आणि त्यानिमित्ताने हिंसक घटना घडविल्या जात असाव्यात असा संशयही शेलार यांनी यावेळी व्यक्त केलाय. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली.
उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक
तत्पूर्वी रत्नागिरीत झालेल्या परिषदेतही शेलार यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ज्या लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांच्या पवित्र भूमीतून सांगतो, महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे हे आहेत. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अशी सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनी केली. त्याच महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री फक्त माझं, कुटुंब माझी जबाबदारी हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे, या धोरणाने काम करीत आहेत, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.
उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकण विरोधी आहे. त्यावेळी कोकणचे सुपुत्र नारायण राणे मुख्यमंत्री झाले त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी षडयंत्र केले. तर सुरेश प्रभू यांना सुद्धा त्याकाळी अपमानास्पद वागणूक उद्धव ठाकरे यांनी दिली होती. बाकी रामदास कदम यांच्याही बाबतीत तेच झाले, अन्य नावे मी घेत नाही. तर आता नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाले त्यानंतर त्यांना अटक करण्यात आले. कोकणाला काही मिळाले की उद्धव ठाकरे यांच्या पोटात का दुखते? असा सवाल करत याचा संताप कोकणवासीयांना मध्ये आहे. येणाऱ्या काळात कोकणातील जनता हा संताप दाखवून देईल, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
दरम्यान, वडाळ्यातील एका व्यक्तीने सरकार विरोधी लिहिले म्हणून त्याचे सार्वजनिक ठिकाणी केशवपन करण्यात आले. एका निवृत्त नौदलाच्या अधिकाऱ्यांनी एक व्यंगचित्र फॉरवर्ड केले, म्हणून त्यांचा डोळा फोडण्यात आला, तर अभिनेत्री कंगना यांचे घर तोडण्यात आले. सरकार विरोधात बोलले म्हणून एका संपादकाला घरात घुसून अटक केले गेले. महाराष्ट्रात जे असहिष्णुतेचे हे वातावरण तयार झाले आहे त्याचे जनक उद्धव ठाकरे हे आहेत, या शब्दांत आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला.




