महाराष्ट्र सरकारची काळजी उद्धव ठाकरेंनी करावी : अमित शाह

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाने अक्राळविक्राळ रुप धारण केलं असताना राज्य आणि केंद्र सरकारमधील समन्वयाचा अभाव चिंतेचा विषय ठरतोय. याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सत्तांतरावर भाष्य केलंय. ‘तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सरकार चिंतेंचा विषय आहे का?’ असा प्रश्न गृहमंत्री अमित शहा यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ‘महाराष्ट्रातील करोना संक्रमणाची चिंता जरुर आहे… पण महाराष्ट्र सरकारची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करायची आहे’, असं शहांनी म्हटलंय.
इंग्रजी वृत्तवाहिनी ‘टाईम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी झालेल्या नुकत्याच झालेल्या बैठकीचे तपशील सांगण्यास शहा यांनी नकार दिला. अमित शहा आणि शरद पवार यांच्या भेटीची जोरदार चर्चा झाली होती, परंतु या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला भेटीच्या चर्चेंवर थेट बोलण्यास अमित शहा यांनी टाळाटाळ केली. महाराष्ट्रात काँग्रेस – राष्ट्रवादी आणि शिवसेना महाआघाडी सरकारमध्ये याच विषयावर मोठा राजकीय तणाव निर्माण झालेला दिसला होता.
‘शिवसेनेनं भारतीय जनता पक्षासोबत विधानसभा निवडणूक लढवली होती. युतीत ते अगोदरपासूनच लहान भागीदार होते. पण जेव्हा संधी मिळाली तेव्हा मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाचा हात सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. वैचारिकदृष्या हे एकमेकांपासून कोसो दूर आहेत. त्यामुळे पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय की ही अपवित्र महाआघाडी आहे आणि आपल्या वजनानंच ती खाली पडेल. त्यासाठी आम्हाला काहीही करावं लागणार नाही.
रेमडेसिवीरचं राजकारण
रेमडेसिविर हे औषध महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांत तयार होतं. आम्ही उत्तर प्रदेशऐवजी महाराष्ट्राला रेमडेसिविर पुरवलं. महाराष्ट्रात वाढत जाणारा रुग्णसंख्येचा आकडा पाहता मला त्यांची चिंता समजतेय पण यापद्धतीचं राजकारण योग्य नाही, असंही शहा यांनी म्हटलंय.
कोरोना संकटावर प्रत्येक राज्याला निर्णय घेण्याचा अधिकार
अमित शाह यांनी लॉकडाऊनचा चेंडू राज्यांच्या कोर्टात ढकलला आहे. लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्याने आपापले निर्णय घ्यावेत, असे संकेत अमित शाह यांनी दिले. गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना निर्बंध लादण्याचे अधिकार राज्यांच्या हातात देण्यात आले आहेत. कारण, प्रत्येक राज्यातील परिस्थिती एकसारखी नाही. त्यामुळे प्रत्येक राज्याला तेथील परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतील, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.
गेल्यावर्षी देशात पहिल्यांदा लॉकाडऊन लागला तेव्हा आरोग्य यंत्रणा दुबळी होती. बेडस्, कोरोना चाचणी आणि ऑक्सिजन अशा अनेक सुविधांची वानवा होती. मात्र, गेल्या वर्षभरात केंद्र आणि राज्य सरकारने बरीच तयारी केली आहे. त्यामुळे यंदा लॉकडाऊन आणि इतर निर्बंधांचे अधिकार घेण्याची जबाबदारी प्रत्येक राज्यावर सोपवण्यात आली आहे. केंद्र सरकार त्यांना पूर्णपणे मदत करेल, असेही अमित शाह यांनी सांगितले.
देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय केंद्र सरकार घाईघाईने घेणार नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. तुर्तास घाईघाईने लॉकडाऊन करावे, अशी परिस्थिती नाही. कोरोना संसर्गाचा वेग प्रचंड आहे, पण या विषाणूवर आपण नक्की विजय मिळवू, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.
गेल्यावर्षी लॉकडाऊन लावला तेव्हा उद्देश वेगळा होता. त्यावेळी आमच्याकडे कोणतेही औषध किंवा लस नव्हती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. केंद्र सरकार तत्पर नाही, असे नव्हे.आम्ही सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहोत, दोन बैठकाही झाल्या आहेत. त्यावेळी मीदेखील हजर होता. सर्वांच्या सहमतीने जे ठरेल त्याला अनुसरूनच आम्ही पुढे जाणार आहोत. परंतु, घाईगडबडीने देशभर लॉकडाऊन लागू करावे, अशी परिस्थिती सध्या दिसत नाही, असे शाह यांनी म्हटले.
निवडणुकांमुळे कोरोना वाढला असता तर बंगालमध्ये ४ हजारच रुग्ण का?
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात कोरोनाचे निर्बंध पायदळी तुडवण्यात आल्याने देशातील कोरोना संसर्गात मोठी वाढ झाली, अशी टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी मात्र निवडणुका आणि कोरोना संसर्गाचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, रुग्णवाढीचा संबंध निवडणुकांशी जोडणे योग्य नाही. ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या नाहीत त्या राज्यांत जास्त रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रात निवडणुका आहेत का? मग तिकडे 60 हजार आणि पश्चिम बंगालमध्ये 4 हजार रुग्ण आहेत. यावर तुम्ही काय म्हणाल, असा प्रतिसवाल अमित शाह यांनी केला.
लसींचा कोणताही तुटवडा नाही
लसीकरणासंदर्भात वैज्ञानिकांशीही चर्चा सुरू आहे. करोनाशी लढण्याची पूर्ण तयारी केली जात आहे. कोरोना संक्रमण प्रसाराचा वेग प्रचंड असल्यानं लढा देणं थोडं कठीण आहे. पण, मला विश्वास आहे की, आपण त्यावर विजय मिळवू. आपल्या लसीकरण कार्यक्रमाचा वेग जगात सर्वाधिक आहे. पहिल्या दहा दिवसांत भारतात उच्चांकी लोकांचं लसीकरण केलं गेलं. पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसमध्ये काही दिवसांचं अंतर असलं पाहिजे. त्यामुळे दुसरा डोस देण्याचा कार्यक्रमाला वेगवान केलं जाऊ शकत नाही. लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या वृत्ताशी मी सहमत नाही, असेही अमित शाह यांनी स्पष्ट केले.




