कांदिवली बनावट लसीकरण; डॉ. मनीष त्रिपाठी पोलिसांना शरण

मुंबई : कांदिवली बोगस लसीकरणातील मास्टरमाइंड डॉ. मनीष त्रिपाठी याचा जामीन सोमवारी दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानुसार त्याने मंगळवारी कांदिवली पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचे वकील अॅड. आदिल खत्री आणि कुटुंबीय देखील हजर होते.
माझे अशील डॉ. त्रिपाठी हे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास दंडाधिकारी अथवा परिमंडळ अकाराचे पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयात आत्मसमर्पण करतील आहेत, असे अॅड खत्री यांनी सांगितले होते. त्यानुसार आज कांदिवली पोलीस ठाण्यात सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांनी हे आत्मसमर्पण करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. कांदिवलीतील हिरानंदानी हेरीटेज सोसायटीमध्ये ३० मे, २०२१ रोजी हे बोगस लसीकरण करण्यात आले होते. डॉ. त्रिपाठीच्या अटकेमुळे आता यातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होण्यास मदत होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.




