मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा परत मिळवून देणार : हेमंत नगराळे
मुंबईः मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी नुकताच पदभार स्वीकारलाय. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारत असल्याचं सांगितलंय. मी हेमंत नगराळे, IPS 87 बॅचचा, आताच मी चार्ज घेतला आहे. मुंबई पोलीस आयुक्त म्हणून चार्ज घेतला आहे. सर्वांना माहिती आहे, मुंबई पोलीस सध्या एका कठीण समस्येतून जात आहे, असंही हेमंत नगराळे म्हणालेत.
ही समस्या आपण सगळ्यांच्या मदतीने, पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मदतीने सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी नेमणूक केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे मी हा कार्यभार स्वीकारला आहे. येणाऱ्या दिवसात जी मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे, त्याला चांगलं करण्याचा आणि आमच्या मुंबई शहरामधील अधिकारी कर्मचारी सगळ्यांचं सहकार्य, सहभाग या कार्यामध्ये लाभणार असल्याचंही हेमंत नगराळे यांनी सांगितलंय.
चांगलं सक्षम पोलीस दल म्हणून काम करु. त्यात निश्चितपणे मला यश मिळेल हा विश्वास आहे. आपण सर्वांनी या कार्यात सहकार्य करावं, जेणेकरुन महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांचं नाव चांगलं होईल. कोणतीही टीका मुंबई पोलिसांवर होणार नाही, अशी परिस्थिती सर्वांच्या सहकार्याने, चांगलं सक्षम पोलीस दल म्हणून काम करु, अशी मी ग्वाही देतो, असंही ते म्हणालेत.
मागील काही दिवसापासून आपण जे काही बघताय, ज्यापद्धतीने अधिकाऱ्यांचा समावेश आहे, त्याचा तपास योग्य पद्धतीने रीतसर तपास NIA किंवा ATS कडून करण्यात येत आहे. तो तपास योग्य रितीने होईल, याची खात्री आहे. जे कोणी दोषी, सहभागी असेल, त्या सर्वांवर कारवाई होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.