हिरेन हत्या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी एनआयएला हवी एक महिन्याची मुदत

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी ३० दिवसांची मुदतवाढ मिळावी, यासाठी एनआयएने विशेष न्यायालयात अर्ज केला आहे.
तपास सुरू झाल्यानंतर ९० दिवसांत तपास यंत्रणा दोषारोपपत्र दाखल करू न शकल्याने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वझे, रियाझुउद्दीन सिद्दीकी आणि सुनील माने यांनी आपल्याला जामीन मिळावा, यासाठी विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर एनआयएने आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मगण्याकरिता न्यायालयात अर्ज केला. ९ जून रोजी विशेष न्यायाधीश प्रशांत सिंत्रे यांनी एनआयएला दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ६० दिवसांची मुदतवाढ दिली होती.
दरम्यान, एनआयएने न्यायालयाला सांगितले की, न्यायालयाने दिलेल्या मुदतीत तपास यंत्रणेने पुढे तपास करत पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या कागपत्रांचे विश्लेषण करून अधिक तपास करायचा आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेली मुदतवाढ पुरेशी नाही. त्यामुळे आणखी ३० दिवस वाढवून द्यावेत. अंटालिया स्फोटके प्रकरणी तोंड बंद ठेवण्यासाठी मनसुख हिरेन याची हत्या करण्याकरिता आरोपींना ४५ लाख रुपये देण्यात आल्याचा दावाही एनआयएने केला आहे. सराईत गुन्हेगारांना सुपारी देऊन हिरेन यांची हत्या घडवून आणली गेली, असा खळबळजनक खुलासा एनआयएनं केला आहे. हिरेन यांना मारण्यासाठी ४५ लाखांची सुपारी देण्यात आल्याचं एनआयएनं सांगितलं आहे.




