आरोग्य

हाफकिन इन्स्टिटयूटमध्ये कोवॅक्सीन लसनिर्मितीस केंद्र सरकारची मान्यता

मुंबई : हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरू होऊ शकते, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी आज राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना याबाबत पत्र पाठवले आहे. वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास १ वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरू करावे तसेच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी आज मुख्य सचिवांना सांगितले. कोविडच्या विळख्यात अडकलेल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने ही खूप मोठी बाब ठरली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मार्च महिन्यात पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत करोना प्रतिबंधित लसीचे हाफकिनकडून उत्पादन करण्याबाबत विनंती केली होती. हाफकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड यांना मिशन कोविड सुरक्षेंतर्गत लसीची टेक्नॉलॉजी हस्तांतरण करण्यासाठी आयसीएमआरच्या मार्गदर्शनाने परवानगी मिळावी. जेणेकरून लस प्रत्यक्ष उत्पादित करता येईल किंवा फील-फिनिश बेसिसवर हाफकीनला काम करता येईल. यामधून १२६ दशलक्ष कोविड प्रतिबंधक लसी हाफकिनमार्फत उत्पादित होऊ शकतात, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले होते. यावर पंतप्रधानांनी देशात सर्वच राज्यांत अशाप्रकारे लस उत्पादनात पुढाकार घेणाऱ्या उद्योग आणि संस्थांना प्रोत्साहन देण्याचे आणि त्यांची क्षमता पूर्णपणे कशी वापरता येईल, ते पाहण्याचे बैठकीत जाहीर केले होते. त्यानंतर आता प्रत्यक्षात मुख्यमंत्री ठाकरे यांची मागणी मान्य झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button