
नवी दिल्ली : पंतप्रधानांसोबत व्यक्तिगत ३० मिनिटे भेट झाली. सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत वैयक्तिक भेट झाली, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. या भेटीत वावगं काहीच नाही. मी काही नवाझ शरीफ यांच्या भेटीसाठी गेलो नव्हतो, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. ही भेट अधिकृत बैठक होती, असंही सांगण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विसरले नाहीत. परंतु, या व्यक्तिगत भेटीमुळे एका वेगळ्या चर्चेलाही तोंड फुटलंय.
मोदी-ठाकरे यांच्या बंद खोलीतील भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची कूस बदलणार का?, अशी चर्चाही या निमित्ताने होत आहे.
महाविकास आघाडी सरकारकडून पंतप्रधान मोदींकडे खालील मांडलेले प्रमुख मुद्दे –
१. मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने भूमिका घ्यावी
२. इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण
३. मागासवर्गियांच्या पद्दोन्नतीतल्या आरक्षणाचा मुद्दा
४. मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेची उपलब्धता
५. केंद्राकडून मिळणारा जीएसटीचा परतावा वेळेत द्यावा.
६. पीक विमा अटी-शर्थींच्या सुलभीकरणावर चर्चा
७. बल्क ड्रग पार्क : स्पर्धात्मक निविदेस मंजुरी
८. चक्रीवादळानंतर मदतीचे निकष बदलण्याबाबत
९. १४ व्या वित्त आयोगातील थकित निधी मिळावा
१०. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या
११. राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवड करण्याबाबत
१२. नैसर्गिक आपत्तीमधील मदतीसाठी एनडीआरएफचे कॉस्ट नॉर्म (निकष) बदलणे




