पाकिस्तानच्या अणुबॉम्बचे जनक अब्दुल कादीर खान यांचे निधन

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या अणुबॉम्बचे जनक अणुशास्त्रज्ञ वैज्ञानिक अब्दुल कादिर खान यांचे अल्पशः आजाराने रविवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. १९३६ मध्ये भोपाळमध्ये जन्मलेले आणि १९४७ साली विभाजन झाल्यानंतर आपल्या कुटुंबियांसोबत पाकिस्तानमध्ये गेलेल्या अब्दुल खान यांनी इस्लामाबादच्या खान रिसर्च लॅबोरेटरीज रुग्णालयात आज शेवटचा श्वास घेतला.
असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तानच्या माहितीनुसार, अब्दुल खान यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर २६ ऑगस्टला केआरएल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रावळपिंडीमधील एका लष्करी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु कोरोनातून मुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, श्वास घेण्यास अडचण होत असल्यामुळे आज तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, फुफ्फुसात रक्तस्राव झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली. त्यांच्या फुफ्फुसांनी काम करणे बंद केले आणि त्यांना वाचवू शकले नाहीत.