मनोरंजन

बीटीएस आर्मीने अवघ्या काही तासांत जमवला १५ लाखांचा कोरोना सहाय्य निधी

बीटीएस आर्मीकडून देशभरात मदतीचा हात

मुंबई (गार्गी बाबर) : कोरोना महामारीने अवघे जग व्यापले आहे. भारतासह अनेक देशांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाभयंकर फटका बसू लागला आहे. पहिल्या लाटेने लाखोंचे रोजगार बुडाले तर आता दुसऱ्या लाटेमुळे दिवसाला हजारोंना आपला जीव गमवावा लागतो आहे. कोरोनाच्या या महासंकटात अनेक दानशूर व्यक्ती आपापल्या परीने सढळ हाताने अव्याहतपणे गरजूंच्या मदतीला उभे राहत आहेत. या संकटाच्या काळात के पॉप बीटीएस ब्रॅण्डच्या चाहत्यांची बीटीएस आर्मीही मागे राहिलेली नाही. भारतातील बीटीएस आर्मीने केवळ काही तासांत सुमारे पंधरा लाखाची रक्कम आ‍ॅनलाईन पद्धतीने जमा केली असून या रकमेचा उपयोग कोरोना उपचार, रुग्णसहाय्य, आ‍ॅक्सिजन पुरवठा, औषधे, अन्न पुरवठा आदी कारणांकरीता करण्यात येणार आहे. बीटीएस आर्मीतील सहभागींचे वय जेमतेम १० ते २० या वयोगटातील आहे, म्हणूनच या कोवळ्या वयातील किशोरवयीन, तरुणांनी दाखवलेले माणुसकीचे हे दर्शन सर्वांनाच प्रेरणादायी आणि कौतुकाचे ठरते आहे.

दक्षिण कोरियातील बीटीएस या के पॉप ब्रॅण्डने साऱ्या जगाला वेड लावले आहे. या ग्रुपच्या सात कलाकारांनी ऐन टाळेबंदीच्या काळातही संगीत सेवा थांबवलेली नव्हती. मागच्या संपूर्ण वर्षात बीटीएसने जागतिक विक्रम करणारे संगीत जगासमोर आणले. त्यांच्या या यशाने कोरियन सरकारनेही सैन्यात सामील होण्याची महत्वपूर्ण अटही या कलाकारांसाठी शिथिल केली होती. इतकेच नाही तर जगभरातील तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी या कलाकारांना युनायटेड नेशन्सने ७५ जनरल असेंब्लीमध्ये त्यांना आमंत्रित केले होते. या कलाकारांनी यावेळी नेव्हर गिव्ह अप, द स्टार्स शाईन ब्राईटेस्ट, व्हेन द नाईट इज डार्केस्ट असा मोलाचा सल्ला देत कोरोनावरच नाही तर आयुष्यातील प्रत्येक संकटावर मात करण्याचे आवाहन केले होते. भारतातही गत काही वर्षात बीटीएसचा फॅन क्लब मोठया प्रमाणात तयार झाला आहे. जगभरातील बीटीएस चाहते बीटीएस आर्मी या नावाने ओळखले जातात.

बीटीएसच्या कलाकारांनी यापूर्वीही जगभरातील अनेक आपत्तीप्रसंगी भरभरुन आर्थिक सहकार्य केले आहे. साथीच्या आजाराच्या इतिहासात भारताला सर्वात वाईट कोविड उद्रेकाचा सामना करावा लागला आहे. दुसरी लाट पहिल्यापेक्षा खूपच भयानक आहे आणि पायाभूत आरोग्यसेवा सुविधांवर खूप ताण आहे. भारतातील बीटीएस आर्मीने अनुभूती ट्रस्ट, टीवायसीआयए फाउंडेशन आणि मजदूर किचन यांच्या सहभागीदारीने निधी संकलनाचे काम सुरु केले आहे. या कार्याला देशभरातून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळतो अहे. या निधीतून – विनामूल्य आ‍ॅक्सिजन सिलेंडर पुरवठा करणे, – वैद्यकीय पुरवठा, – कम्युनिटी किचन इनिशिएटिव्ह, आदी सुविधा महाराष्ट्र आणि दिल्ली, लखनऊ, बेंगळुरू, रांची या शहरांतील गरजूंना देण्यात येणार आहेत.

महामारीच्या संकटात माणुसकीच्या भिंती उभ्या करण्यासाठी लाखोंच्या संख्येने हातात हात घालून संवेदनशिलता दाखवणाऱ्या बीटीएस आर्मीच्या सर्व संगीतप्रेमी जवानांना ‘डीजी न्यूज २४’चा सलाम…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button