Top Newsराजकारण

ठाकरे सरकार वाचवण्यासाठी हालचाली; काँग्रेसला डावलून राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांची बैठक !

मुंबई: महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याच्या घडामोडी सातत्याने समोर येत आहेत. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता नवी माहिती समोर आली आहे. सरकार वाचवण्यासाठी संजय राऊत यांच्या हालचाली सुरु असल्याचं सुरु आहे. मंगळवारी गुप्त बैठक झाली. या बैठकीला संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित होते. विशेष म्हणजे या गुप्त बैठकीला काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता.

काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवण्याचा दिलेला नारा, आघाडीच्या नेत्यांच्या सुरू असलेल्या चौकश्या, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयामुळे सरकारची झालेली कोंडी आदी पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ही गुप्त बैठक झाल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीला केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मोजकेच नेते उपस्थित होते. या बैठकीचं ठिकाण अत्यंत गुप्त ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे या बैठकीची कुणालाही माहिती नव्हती. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली असून पुढील रणनीती ठरवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सातत्याने काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढेल अशी वक्तव्ये केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत चलबिचल असल्याचं दिसतं. त्यातच संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर ते शरद पवारांच्या भेटीला गेले होते. याशिवाय दोन दिवसापूर्वी शरद पवार स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी गेले होते.

आधीपासूनच सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीने वर्चस्व ठेवलं आहे. अनेक महत्त्वाच्या निर्णयातून काँग्रेसला डावललं आहे. त्यात आता या बैठकीपासूनही काँग्रेसला दूर ठेवल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नेमकी काय खिचडी शिजतेय? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीने आघाडी करूनच लढण्याची चर्चा या बैठकीत झाल्याचं बोललं जात आहे. तसेच उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण होऊ शकतं. राज्य सरकारला दगाफटका करण्याचं काम होऊ शकतं, त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सरकार ५ वर्षे चालेल : पटोले

एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या गुप्त बैठकीचं वृत्त समोर आल्यानंतर, तिकडे स्वबळाची भाषा करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार वाचवायचा प्रश्नच नाही आम्ही तिघेही सोबत आहोत. सरकार पाच वर्ष चालेल, असं नाना पटोले यांनी ठणकावून सांगितलं.

दरम्यान, नाना पटोले यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या खात्यातील कथित घोटाळ्यावरही भाष्य केलं आहे. मी कुठलेही पत्र ऊर्जाविभागाच्या विरोधात लिहिलेलं नाही. नागपूरच्या खणीकरण विकास महामंडळाने जे कोलवॉशिंगचे टेंडर काढले होते ते चुकीच्या पद्धतीने काढले होते. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते, यामध्ये ऊर्जा विभागाचा काही संबध नाही. कॉंग्रेसमध्ये आपआपसात भांडणे आहे असे दाखवण्याचा प्रयत्न झाला तो काही बरोबर नाही. खणीकरण महामंडळाचा विषय ऊर्जा विभागाचा आहे असे दाखवून नितीन राऊत आणि माझ्यात भांडण लावण्याचा प्रयत्न झाला ते चुकीचा आहे.

साखर कारखान्यांवर ईडीची धाड

सरकारने ईडी आणि सीबीआयला पोपट केले आहे. दुसऱ्या पक्षांना घाबरवण्यासाठी अशा तपास यंत्रणांना हाताशी धरुन कारवाया करणे घातक आहे. अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणी करुन विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत काही गोंधळ घालता येईल का याची चाचपणी केली जात आहे, असा आरोप नाना पटोले यांनी भाजपवर केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button