शिक्षण

महाराष्ट्रातील दहावी-बारावीचे विद्यार्थी वाऱ्यावर; पालक चिंताग्रस्त!

मुंबई : महाराष्ट्र सरकारनं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यासोबत बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. वर्षभर ऑनलाईन शिक्षण सुरु होते. मात्र, कोरोनाची परिस्थिती पाहता विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण मंत्रिमंडळानं दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. मात्र, अद्याप महाराष्ट्राचा दहावीच्या विद्यार्थ्यांना कसे गुण देणार याचा फॉर्म्युला ठरलेला नाही, तर मे महिना निम्मा संपला तरी बारावीच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारने कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी तणावात, तर पालक चिंताग्रस्त बनले आहेत.

सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाप्रमाणं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळानं घेतला. सीबीएसई आणि आयसीएसईच्या बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं देखील दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचा शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळानं अद्यापही दहावीच्या विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे गुण देणार याविषयी निर्णय घेतलेला नाही. दहावीच्या निकालाबाबत कार्यपद्धती जाहीर झालेलीनाही. दुसरीकडे तेलंगणा राज्य सरकारनं त्यांच्या राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेतला आहे.

तेलंगणा सरकारच्या शिक्षण विभागानं दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. तेलंगाणा राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करत आहोत, सर्व विद्यार्थ्यांना दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात येत आहे, अशी माहिती शिक्षण विभागानं दिली. विद्यार्थ्यांच्या निकाल काही दिवसांनंतर तेलंगाणा बोर्डाच्या वेबसाईटवर अपलोड केला जाणार आहे.

महाराष्ट्रातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती वाईट होतं आहे. हे पाहता महाराष्ट्र शासनानं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी, शिक्षक यांचं आरोग्य आमच्यासाठी पहिलं प्राधान्य असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे निकष लवकरच जाहीर केले जातील. सर्व विद्यार्थ्यांचं अचूक आणि निष्पक्ष मूल्यांकन करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग कटिबद्ध आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या.

इयत्ता १० वी परीक्षा रद्द करणे आणि इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात विविध पर्यायांबाबत शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी व राज्य मंडळ परीक्षा सल्लागार समिती यांच्या काही बैठका देखील झाल्या आहेत. मात्र, अद्याप दहावीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. दरम्यान, अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घ्यावी का, या बाबत विद्यार्थ्यांची मते मागवण्यात आली होती. त्यापैकी ६५ टक्के विद्यार्थ्यांनी अकरावीसाठी सीईटी घ्यावी असं म्हटलंय मात्र, यामध्ये मुंबईमधील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button