स्पोर्ट्स

ऑनलाईन टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझमध्ये प्रीतम उपाध्याय विजेता

मुंबई : ऑनलाईन टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझमध्ये क्लस्टर १०च्या अंतिम फेरीत आयआयटी मुंबईच्या शैलेश जे मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या प्रीतम उपाध्यायने विजेतेपद जिंकले आहे. महाविद्यालयांसाठी आयोजित करण्यात येणारी भारतातील सर्वात मोठी बिझनेस क्विझ यंदा पहिल्यांदाच ऑनलाईन आयोजित करण्यात येत आहे.

टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझच्या क्लस्टर १०मध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांचा समावेश आहे. या अंतिम फेरीमध्ये स्पर्धकांनी आपली चाणाक्ष बुद्धी, वेगवान विचार आणि क्वीझिंग क्षमता दर्शवून सर्वांना अचंबित केले. विजेत्याला ३५,०००* रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच त्याला राष्ट्रीय अंतिम फेरीमध्ये पात्र ठरण्यासाठी झोनल अंतिम फेरीत देखील सहभागी होता येणार आहे. मुंबईच्या स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, एनएमआयएमएसच्या सिद्धार्थ मिश्राने उपविजेतेपद पटकावले असून त्याला १८,०००* रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या लीडरशिप टीमचे सदस्य व ग्रुप चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर श्री. सिद्धार्थ शर्मा हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्हर्च्युअल पारितोषिक वितरण समारोहात त्यांनी विजेत्यांना बक्षिसे दिली. महामारीमुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीमुळे टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझ २०२० प्रमाणेच कॅम्पस क्विझ देखील पहिल्यांदा व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.

ऑनलाईन कॅम्पस क्विझसाठी देशात एकूण २४ क्लस्टर्स तयार करण्यात आले आहेत. ऑनलाईन प्रिलिम्सच्या दोन स्तरांनंतर प्रत्येक क्लस्टरमधील आघाडीच्या १२ स्पर्धकांना वाईल्ड कार्ड फायनल्ससाठी आमंत्रित करण्यात येईल. त्यापैकी आघाडीचे ६ स्पर्धक २४ ऑनलाईन क्लस्टर फायनल्समध्ये सहभागी होतील. या २४ क्लस्टर्सचे दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि उत्तर असे चार झोन तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक झोनमध्ये ६ क्लस्टर्स आहेत.

प्रत्येक क्लस्टर अंतिम फेरीतील विजेता/विजेती झोनल अंतिम फेरीमध्ये सहभागी होईल. चार झोनल अंतिम फेरीतील विजेते थेट अंतिम फेरीसाठी पात्र मानले जातील. चार झोनल अंतिम फेरीतील उपविजेते वाईल्ड कार्ड फायनलमध्ये उतरतील आणि ४ उपविजेत्यांपैकी २ राष्ट्रीय अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. एकूण ६ स्पर्धक राष्ट्रीय अंतिम फेरीत सहभागी होतील. त्यांच्यामध्ये सर्वाधिक गुण पटकावणाऱ्या स्पर्धकाला राष्ट्रीय विजेता घोषित केले जाईल व त्याला/तिला २.५ लाख रुपयांचे महापरितोषिक व प्रतिष्ठित टाटा क्रुसिबल ट्रॉफी देऊन गौरवण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button