इंग्लंड दौऱ्यानंतर रंगणार आयपीएलचा थरार ! उर्वरित सामन्यांच्या तारखा जाहीर

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या आयपीएलच्या १४ व्या मोसमातील उर्वरित सामन्यांबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. आयपीएल २०२१ च्या मोसमातील उर्वरित ३१ सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत, अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली आहे.
टी-२० विश्वचषक भारतात होणार आहे, परंतु कोरोना संसर्गाचा प्रदुर्भाव पाहता बीसीसीआय टी-२० विश्चचषक स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करू शकते, अशी शक्यता आहे. बीसीसीआयने आयसीसीकडे टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनाच्या परिस्थितीविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी २८ जूनपर्यंत मुदत मागितली आहे.
आयपीएल २०२१ मधील १९ सामने यापूर्वीच खेळविण्यात आले आहेत. ज्यानंतर अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाचा संसर्ग झाला आणि परिणामी कोरोनाच्या संक्रमणामुळे आयपीएलचं १४ वं पर्व अनिश्चित काळासाठी पुढे ढकलावं लागलं.
आयपीएलच्या १४ व्या पर्वातील उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार असून टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आधी हे सामने खेळवण्याचा बीसीसीआयचा प्लॅन आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी-२० विश्वचषकांच्या तारखांची अधिकृत घोषणा केलेली नाही. जुलैमध्ये टी ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेविषयी अंतिम घोषणा होण्याची शक्यता आहे.




