Top Newsइतर

तौक्ते चक्रीवादळामुळे १० हजार ७५२ गावातील वीज पुरवठा खंडित

४६ लाख ४१ हजार ग्राहकांना फटका

मुंबई : तौक्ते चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, पुणे आणि राज्यातील इतर जिल्ह्यांतील १० हजार ७५२ गावांतील ४६ लाख ४१ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ६ हजार ४० गावातील ३४ लाख १४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा मंगळवारी संध्याकाळपर्यंत सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे.

चक्रीवादळाच्या तडाख्याने राज्यात शेकडो पोल पडले. तारा तुटल्या आणि जोरदार वारा तसेच मुसळधार पावसाने फिडर ट्रिप झाले. अंधार्‍या रात्रीची तमा न बाळगता रात्रभर जागून नागरिकांना सेवा दिली. तसेच आताही वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी आणि तंत्रज्ञ यांचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कौतुक केले आहे.

चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन डॉ. राऊत यांनी एक कृती आराखडा तयार करून विविध ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. तसेच अधिकाधिक मनुष्यबळ याकामी लावण्याचे आणि लागणारी पुरेशी सामुग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, कोल्हापूर, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे इत्यादी जिल्ह्यांसाठी २४ तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष वरिष्ठ अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली सध्या कार्यरत आहेत. तसेच विभाग स्तरावर ४६ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीने १३ हजार तंत्रज्ञांची फौज मैदानात उतरवली आहे. या चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा फटका ठाणे जिल्ह्याला बसला आहे. येथील ७ लाख ८५ हजार ग्राहकांची बत्ती गुल झाली होती. मंगळवारी संध्याकाळपर्यंत जवळपास ५ लाख ५० हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button