मंदाकिनी खडसे यांना अटकेपासून तूर्त दिलासा

मुंबई : पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. मंदाकिनी खडसे यांना तूर्तास अटक न करण्याचे निर्देश ईडीला दिले आहेत. १७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत तपासात सहकार्य करण्याचे निर्देश देखील खडसे यांना हायकोर्टानं दिले आहेत.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं एकनाथ खडसेंच्या पत्नी आणि याप्रकरणातील आरोपी मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. तसेच त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आलं होतं.
खडसे कुटुंबियांविरोधात ईडीकडनं याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या १ हजार पानी आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. या सर्वांवर मनी लॉड्रींगचा आरोप लावण्यात आला आहे. त्याचबरोबर याप्रकरणी अटकेत असलेल्या गिरीश चौधरी यांचा जामीन अर्जही मुंबई सत्र न्यायालयानं शुक्रवारी फेटाळून लावला. चौधरी यांनी याप्रकरणी आपल्याला बळीचा बकरा बनवलं गेलंय असा आरोप केला होता. मात्र, विशेष पीएमएलए कोर्टानं हा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे भाजपसोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या एकनाथ खडसेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. साल २०१६ मध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्री असताना हा सारा व्यवहार झाला होता. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत याची चौकशीही झाली होती. मात्र, एसीबीनं खडसे यांना याप्रकरणी क्लीन चीट दिली होती.




