
मुंबई : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या टी-२० संघाचे नेतृत्व कोणाकडे जाईल याची सर्वांना उत्सुकता होती. भारतीय संघ १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यासाठी बीसीसीआयनं आज संघ जाहीर केला आणि अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माकडे टीम इंडियाच्या टी-२० संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. या मालिकेसाठी निवड समितीनं १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
आज जाहीर करण्यात आलेल्या संघातून विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्थी, शार्दूल ठाकूर यांना विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिक पांड्याला नॅशनल क्रिकेट अकॅडेमीमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला गेल्याचे समजते. चेन्नई सुपर किंग्सचा ऋतुराज गायकवाड, कोलकाता नाइट रायडर्सचा वेंकटेश अय्यर, दिल्ली कॅपिटल्सचा आवेश खान, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा हर्षल पटेल यांना संधी मिळाली आहे.
टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा सामना झाल्यानंतर लगेचच भारतीय क्रिकेट संघ विविध अशा चार देशांना भारतात खेळण्यासाठी घेऊन येणार आहे. यामध्ये न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे. या सर्व सामन्यांचे वेळापत्रकही नुकतेच जाहीर झाले आहे.
टी-२० मालिकेनंतर कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिली कसोटी २५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान कानपुरच्या ग्रीन पार्क येथे खेळवली जाईल. त्यानंतर दुसरी कसोटी ३ ते ७ डिसेंबर या काळात मुंबईतील वानखेड़े मैदानात खेळवली जाईल.
पहिला ट्वेंटी-२०- १८ नोव्हेंबर, २०२१, जयपूर
दूसरा ट्वेंटी-२० – १९ नोव्हेंबर, २०२१, रांची
तिसरा ट्वेंटी-२० – २१ नोव्हेंबर, २०२१, कोलकाता
भारतीय संघ : रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल ( उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.




