
मुंबई : मुंबईच्या अनेक भागांमध्ये शनिवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक भागांमध्ये तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अनेक भागांमध्ये घरांमध्ये देखील पाणी शिरल्याचं दिसून आलं. मात्र, चेंबूरच्या भारत नगर भागात मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआयनं दिली आहे. पावसाच्या परिणामामुळे दरड भिंतीवर कोसळल्यामुळे ही भिंतच कडेच्या घरांवर कोसळली. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही एनडीआरएफचं पथक घटनास्थळी हजर आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून १३ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली आहे. बचावकार्य अजूनही सुरू असून अजून काही नागरिक मलब्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विक्रोळी सूर्यनगर परिसरामध्ये तीन ते चार घरांवर दरड कोसळली आहे. आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश. अद्यापही या ठिकाणी आठ जण अडकले असल्यामुळे बचाव कार्य सुरू आहे. घरांवर दरड कोसळल्यामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत.
Maharashtra | 11 people killed after a wall collapse on some shanties in Chembur's Bharat Nagar area due to a landslide, says National Disaster Response Force (NDRF)
Rescue operation is underway. pic.twitter.com/W24NJFWThU
— ANI (@ANI) July 18, 2021
अजूनही मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.. जखमींना राजावाडी तसंच जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आलंय. बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे.
Maharashtra: Mumbai's Sion Railway track waterlogged following heavy rainfall this morning pic.twitter.com/loTwsBrClG
— ANI (@ANI) July 17, 2021
गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पुन्हा हजेरी लावली. मध्यरात्री १२ वाजल्यापासून पहाटे ३ ते ४ वाजेपर्यंत मुंबईच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता. मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या तुफान पावसामुळे अनेक परिसर जलमय झाले होतो. रात्रभर कोसळल्यानंतर सकाळच्या सुमारास पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानंतर काही भागांमधून पाणी ओसरायला सुरुवात झाली. या पावसामुळे दहिसर नदीचं पाणी बोरीवली पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणावर साचलं होतं. ते देखील ओसरू लागलं आहे. अजूनही मुंबईच्या काही भागांमध्ये पाणी साचलेलं असून मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा रेल्वेच्या वाहतुकीवर पावसाचा परिणाम झाला आहे.




