Top Newsस्पोर्ट्स

रहाणे, पुजाराच्या अर्धशतकानंतरही भारत बॅकफूटवर; दक्षिण आफ्रिकेचे जोरदार प्रत्युत्तर

जोहान्सबर्ग : चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची शतकी भागीदारी आणि हनुमा विहारीची उपयुक्त खेळी या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर २४० धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, यजमान संघाने तिसऱ्या दिवशी बुधवारी खेळ संपला तेव्हा २ बाद ११८ धावा केल्या होत्या. कर्णधार डीन एल्गरने ४६ धावा करून सामना रोमांचक स्थितीत नेला. दक्षिण आफ्रिकेचा संघ अजूनही लक्ष्याच्या १२२ धावांनी मागे आहे.

जोहान्सबर्ग कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळावर दक्षिण आफ्रिकेचा दबदबा दिसून आला. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागात त्यांनी भारतापेक्षा सरस कामगिरी केली. ज्यावेळी विकेट मिळवण्याची गरज होती, तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन विकेट मिळवल्या व जेव्हा खेळपट्टीवर टिकून फलंदाजी गरजेची होती, तेव्हा तशा पद्धतीची फलंदाजी करुन भारतीय गोलंदाजांना नामोहरम केलं. उद्या कसोटीचा चौथा दिवस असून ही कसोटी निकाली निघणार हे निश्चित आहे. फक्त आजच्या सारखाच खेळ उद्याही आफ्रिकी संघाने दाखवला तर मात्र मालिका पुन्हा बरोबरीत येईल. जोहान्सबर्गमधील वाँडर्स मैदानाचा इतिहास अलीकडच्या काही वर्षात भारताच्या बाजूने आहे. त्यामुळे उद्या वाँडर्सच्या मैदानात काय घडणार? त्याची उत्सुकता आहे.

भारताने दुसऱ्या डावात २६६ धावा केल्या. आफ्रिकेने पहिल्या डावात २७ धावांची आघाडी घेतली होती. या मैदानात सर्वांत मोठे लक्ष्य गाठण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. त्यांनी २०११ मध्ये ३१० धावांचे लक्ष्य गाठले होते. एडन मार्क्रम (३१ धावा) आणि कर्णधार डीन एल्गर यांनी सहज सुरुवात केली. दोघांनी ४७ धावांची भागीदारी केली. शार्दुल ठाकूर याने मार्क्रमला बाद केले. त्यानंतर आर. अश्विन याने किगन पिटरसन (११ धावा) याला बाद केले.

आज भारताने २ बाद ८५ वरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर सुरुवातीचा तासभर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने अपेक्षा उंचावणारा खेळ केला. पण रहाणे (५८) आणि पुजारा (५३) धावांवर बाद झाल्यानंतर भारताचा डाव पुन्हा गडगडला. फक्त शार्दुल ठाकूर (२८) आणि हनुमा विहारीने (नाबाद ४०) प्रतिकार केला व भारताची धावसंख्या २६६ पर्यंत पोहोचवली. ऋषभ पंतकडून जबाबदार खेळीची अपेक्षा असताना, त्याने तर आपली विकेट बहाल केली. या डावातही फलंदाजीच भारताची डोकेदुखी ठरली. पुजारा आणि रहाणेने अर्धशतक झळकवून टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं असलं तरी, आज स्पेशल खेळीची गरज होती. कारण हे दोघे बाद झाल्यानंतर अन्य फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. पहिल्या सत्रात रबाडाने तीन बळी घेत दक्षिण आफ्रिकेला पुनरागमन करून दिले. मार्को जेन्सन आणि लुंगी एनगिडी यांनी त्याचा फायदा घेतला.

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात खूप चांगली फलंदाजी केली आहे. मालिकेला सुरुवात झाल्यापासून भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकन फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं आहे. पण आज आफ्रिकन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना दाद दिली नाही. विकेट मिळवण्यासाठी भारतीय गोलंदाजांना संघर्ष करावा लागला. सलामीवीर मार्कराम (३१) आणि पीटरसनला (२८) अनुक्रमे ठाकूर आणि अश्विनने बाद केले. पण या विकेट सुद्धा सहजासहजी मिळाल्या नाहीत. कॅप्टन एल्गर आणि डुसेची जोडी मैदानावर आहे. आठ विकेट आणि दोन दिवस शिल्लक असल्याने पारडं आफ्रिकेचं जड आहे.

बुमराह-जेन्सन मैदानावरच भिडले

जसप्रीत बुमराह आणि दक्षिण आफ्रिकेलाच जलदगती गोलंदाज मार्को जेन्सन यांच्यात चांगलाच वाद झाला. भारताच्या डावात ५४ व्या षटकांत जेन्सनने एक बाऊन्सर टाकला. तो बुमराहच्या खांद्याला लागला. त्यानंतर पुन्हा असे झाले. त्यानंतर दोघेही एकमेकांशी बोलले आणि तेवढ्यात पंचांनी हस्तक्षेप केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button