राजकारण

पुतण्यामुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत!

४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेला तन्मय फडणवीस लस घेतो कसा? काँग्रेसचा सवाल

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने लस घेतल्यावरून सोशल मिडियावर निशाणा साधला जात आहे. संपूर्ण देशात सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जात असताना ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेला तन्मय फडणवीस लस घेतो कसा, असा सवाल काँग्रेसने केला आहे.

राज्यावर कोरोनाचे मोठे संकट असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चिखलफेक करण्यात गुंतले आहेत. रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलकडून देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली, तर आता काँग्रेसनेही फडणवीसांच्या पुतण्याने लस घेण्यावरून निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचा नातू तन्मय याने कोरोनाची लस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच फोटोवरून आता महाराष्ट्र काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांना कचाट्यात पकडले आहे. ४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?, असा सवालच काँग्रेसने उपस्थित केला आहे. भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का!, असेही टीकास्त्र काँग्रेसने ट्विट करत सोडले आहे.

तन्मय फडणवीस माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू असून, त्याचे वय २५ वर्षांहून अधिक नाही. नागपुरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ येथे त्याने लस घेतल्याचा ‘फोटो’ सोमवारी ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ झाला होता. परंतु विरोधकांकडून टीका होताच तो फोटो हटवण्यात आला होता. परंतु तोपर्यंत अनेकांनी त्या फोटोचे स्क्रीन शॉट घेतले होते. तोच फोटो ट्विट करत काँग्रेसने आता देवेंद्र फडणवीसांनाच घेरले आहे.

तन्मयने लस घेतल्याचे एका नेटकऱ्याला मुळीच आवडले नाही. तो आपल्या ट्विटमध्ये म्हणतो ‘देवेंद्र फडणवीस तुमचा पुतण्या तन्मय फडणवीस हा ४५ वर्षांचा आहे का?, जर नसेल तर तो लसीकरणासाठी कसा काय पात्र ठरला?. रेमडेसिवीरप्रमाणे तुम्ही लसीचा साठा केला आणि तुमच्या कुटुंबियांना देत आहात का? लशीच्या तुटवड्यामुळे लोकांचे मृत्यू होत असताना फडणवीस कुटुंब मात्र सुरक्षित आहे.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button