
कणकवली : राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या आणि राणे विरुद्ध शिवसेना व महाविकास आघाडी अशा झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत राणेंनी वचर्स्व मिळवले आहे. वादविवाद, मारहाण प्रकरण आणि कोर्टकचेरी यामुळे गाजलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या नेतृत्वाखालील भाजपाने शिवसेनेला धोबीपछाड दिला आहे. त्यानंतर, राणेंनी आता लक्ष्य महाराष्ट्र असल्याचं म्हटलंय.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धुळ चारल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कायद्याचा, पोलिसांचा गैरवापर करुन महाविकास आघाडी सरकारनं सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमचा पराभव करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी ज्यांना अक्कल आहे अशा लोकांनाच सत्ता मिळाली आणि अक्कल नसलेल्यांचा पराभव झाला, असा खोचक वार करत नारायण राणे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून जो काही प्रकार सुरू होता त्यातून महाविकास आघाडी सरकार किती अस्वस्थ आहे हेच दिसून येत होतं. अखेर आज त्यांना त्यांची जागा कळाली आहे, असंही नारायण राणे म्हणाले.
आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री हवा
आता आमचं टार्गेट महाराष्ट्र सरकार, असं म्हणत नारायण राणे यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचा मुख्यमंत्री हवा आहे, असं विधान केलं. सध्याचा कोरोना काळ, खुंटलेली आर्थिक प्रगती यातून राज्याला बाहेर काढण्यासाठी चांगला मुख्यमंत्री आणि चांगलं सरकार गरजेचं आहे. आम्हाला आता भाजपाचा मुख्यमंत्री हवा आहे, यांच्यासारखी ‘लगान’ टीम नको, असा टोला नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला लगावला.
पोस्टरबाजीवरही साधला निशाणा
नितेश राणे हरवले आहेत अशी पोस्टरबाजी मुंबईत सुरू असल्याचं राणे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी शिवसेनेवर जोरदार प्रहार केला. शिवसेनेचे लोक फक्त पोस्टर लावायच्याच लायकीचे आहेत. आता त्यांनी एका हातात गम आणि दुसऱ्या हातात पोस्टर घेऊन राज्यभर पोस्टर लावत फिरावेत. आम्ही जनतेच्या विकासाचं राजकारण करू, असं राणे म्हणाले.
महाराष्ट्रभर पोस्टर लावत फिरा; शिवसैनिकांना टोला
पोलीस यंत्रणा असताना यांनी पोस्टरबाजी केली. एखाद्याला शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा असते. पण हे केवळ पोस्टर लावण्याच्या पात्रतेचेच आहेत. राज्यकारभार सांभाळण्याची यांची पात्रता नाही. ना राज्याचा ना बँकेचा.. कोणताही कारभार सांभाळण्याची यां लोकांची पात्रता दिसत नाही. त्यामुळे या लोकांनी एका हातात गम आणि दुसऱ्या हातात पोस्टर घ्या आणि महाराष्ट्रभर पोस्टर लावत फिरा, असा टोला नारायण राणेंनी पोस्टरबाजी करणाऱ्या शिवसैनिकांना लगावला.
सगळ्यांना पुरून उरलोय
नारायण राणेला संपवण्याची भाषा करणाऱ्यांना सणसणीत उत्तर मिळालं आहे. तीन पक्ष एकत्र येऊन लढले तरी भाजपाची सत्ता आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आली आहे. इथल्या जनतेनं भुरट्यांच्या हातात सत्ता जाऊ दिली नाही. नारायण राणे एवढ्या वर्षात सगळ्यांना पुरुन उरलाय आणि केंद्रात पोहोचलाय. मध्येच कुठे थांबलेला नाही, असंही नारायण राणे म्हणाले.
अजित पवारांना सणसणीत टोला
संस्था वाढवायला अक्कल लागते. डोकं लागतं. पण बंद पाडायला अक्कल लागत नाही, अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये गेले असताना केली होती. त्यावर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक कायद्याचा आणि पोलिसांचा गैरवापर करुन जिंकण्याचा प्रयत्न सुरू होता. पोलीस यंत्रणेला हाताळी बाळगून निवडणूक जिंकण्याचा मानस कोकणवासियांनी फोल ठरवला आहे. नितेश राणेंचा जामीन अर्ज चार चार दिवस कोर्टात चालतो. माझ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात मी असं पाहिलं नाही. इथं डीजी येऊन ठाण मांडतात. अर्थमंत्री येऊन अक्कल काढतात आणि पक्षाचा पराभव करुन जातात, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.
आम्ही अक्कल वापरुच निवडणूक जिंकली. जनतेनं पण अक्कल वापरुनच मतदान केलं आणि अक्कल असणाऱ्यांनाच सत्ता दिली. तर अक्कल नसलेल्यांचा पराभव झाला, असाही खोचक वार नारायण राणे यांनी अजित पवारांचं नाव न घेता केला आहे.
३६ मतं मिळवू शकत नाही आणि विधानसभेच्या गोष्टी करतो; सतीश सावंतांवर प्रहार
आता आमचं महाराष्ट्र सरकारवर लक्ष आहे. अजून दोन-अडीच वर्षे आहेत. लोकसभा, विधानसभेकडे आमचं लक्ष आहे. तिन्ही जिल्ह्यांत ज्या काही विधानसभेच्या निवडणुका होतील, त्याकडे आमचं लक्ष आहे. लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच असेल. नको असलेल्या चेहऱ्यांकडे लोकप्रतिनिधीपद आमचा जिल्हा ठेवणार नाही. ज्यांना हात नाही ते हाती सत्ता घेतात, कशी पकडतात माहीत आहे का?, असंही नारायण राणे म्हणाले.
काल आमच्या एका महिलेनं तोंड बंद केलं. तोंड बंद होत नाही तेव्हा हड हड हे काय आहे मला कळलं नाही. पुरुष कधीपासून हड बोलायला लागले. व्हिडीओ शूट केलाय ना तो दाखवा ना. आज यांचा इथे सत्कार आहे. त्यांनी बँकेचे पैसे वाटले ते त्याचे नसतील. बँकेचे, भ्रष्टाचारानं मिळवलेले पैसे त्यामुळे त्याचं काही गेलं नाही. जे काही गेलं बँकेचं गेलं. त्यांनी आता बोलू नये, गप्प बसावं. आपली औकात काय, ३६ मतं मिळवू शकत नाही आणि विधानसभेच्या गोष्टी करतात.
अमित शहांना सर्व रिपोर्ट देणार
गेल्या चार दिवसांत कोकणात काय काय झालं. कसा सत्तेचा, कायद्याचा आणि पोलिसांचा गैरवापर केला गेला याची इत्यंभूत माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देणार असल्याचंही नारायण राणे यावेळी म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून जो काही प्रकार सुरू होता त्यातून महाविकास आघाडी सरकार किती अस्वस्थ आहे हेच दिसून येत होतं. अखेर आज त्यांना त्यांची जागा कळाली आहे, असंही राणे म्हणाले.
बारामतीला इथून कर्ज देणार नाही
जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकरी अन् नागरिकांची बँक आहे. त्यांच्यासाठी जिल्हा बँकेचा वापर केला जाईल. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी एग्रीकल्चरचे व्हॅल्यू अॅडेड प्रोडक्ट बनवले जातील. तसेच, ही इंडस्ट्री अॅग्रोसाठी स्थानिक शेतकऱ्यांना दिले जातील. बारामतीला इथून कारखाना घेण्यासाठी कर्ज दिले जाणार नाही, असे नारायण राणेंनी म्हटले. जिल्हा बँकेत अप्रगेडेशन करण्याचा प्रयत्न आहे, एमएसएमई आणि जिल्हा बँक यांच्या माध्यमातून स्थानिकांसाठी काम केले जाईल असेही राणेंनी स्पष्ट केले.
चिठ्ठीवर निवडून येणं म्हणजे मोठ्ठं नशीब … तू टेन्शनमध्ये पाठवलंस !
भाजपचे विठ्ठल देसाई ईश्वरचिठ्ठीने निवडून आले. जेव्हा ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली, तेव्हा देसाईच नव्हे तर खुद्द केंद्रीय सुक्ष्म, लघु, उद्योग मंत्री नारायण राणे यांचीही घालमेल झाली. खुद्द राणेंनीच त्यांची घालमेल कशी झाली हे सांगितलं. निकाल लागत असताना तू आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलं होतं. आंघोळ करता करता मी थांबलो होतो, असं सांगत नारायण राणे यांनी मनमुराद हसून तणावाला वाट मोकळी करून दिली.
तुम्ही (विठ्ठल देसाई) जिंकला खरं वाटतंय… नशीब आहे हां… नशीब आहे… मोठ्ठं नशीब आहे… चिठ्ठीवर येणं म्हणजे मोठ्ठं नशीब. तुम्ही आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलं. मी आंघोळ करता करता थांबलो… म्हटलं अरे काय ते…, असं राणे म्हणाले. तेव्हा एकच खसखस पिकली. स्वत: राणेंनीही हा किस्सा सांगताना मनमुराद हसून दाद दिली.
नारायण राणें को गुस्सा क्यू आता है?
या पत्रकार परिषदेत राणेंनी राजकीय टोलेबाजी केली. मात्र, भाजप नेते नितेश राणे यांच्याविषयी विचारताच राणे भडकले. एक दोनदा नव्हे तर चार पाच वेळा राणे भडकले. डोन्ट से धीस…नो कमेन्ट्स आणि नाही तर मी निघून जाईन, अशी विधाने नारायण राणे यांनी केली. त्यामुळे
पत्रकार परिषद सुरू होताच राणेंनी पत्रकारांना वॉर्निंग दिली. आपसात बोलू नका तुम्ही. एकदा सुरू झालं की संपेपर्यंत बोलू नका, असं राणे भडकतच म्हणाले. नितेश राणे जामीन फेटाळला. पण तुमची प्रतिक्रिया आली नाही, असं विचारलं तेव्हा राणे तिसऱ्यांदा भडकले. नाही नाही. तो कोर्टाचा अधिकार आहे. तुम्हाला माझी प्रतिक्रिया पाहिजे आहे का म्हणजे अजून एक केस. काही लोक प्रयत्न तेच करत आहेत. काही पत्रकारांचं तेच इंटेन्शन आहे, असा आरोप राणेंनी केला.
एका पत्रकाराने नितेश राणेंबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. नितेश राणे प्रकरणात… असं या पत्रकाराने उच्चारताच राणे संतप्त झाले. प्रकरण म्हणू नको, डोन्ट से धीस. प्रकरण कसले रे? ती जखम कसली आहे तू दाखवतो का? तो फिर्यादी हात बांधतो. हाताला जखम आहे? कधी विचारला प्रश्न तुम्ही हात असा का बांधतो? बायको हॉस्पिटलमध्ये कामाला आहे म्हणून पट्ट्या बांधून यायचं असं… अरे खरचंटलंय ते. आणि तो काय सत्कार… अर्थमंत्री येतात सत्काराला. काय मार खाल्लास रे कमी. अजून खायला पाहिजे होता. काय आहे हे…? असा संतप्त सवाल त्यांनी केला.




