कोरोनावरील लसीच्या जागतिक खरेदीबाबत पडताळणी करण्याच्या सूचना
मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीची जागतिक पातळीवरुन खरेदी करण्याच्या अनुषंगाने शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला देण्यात आल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या वेगानं पसरत आहे, त्याचा धोका पाहता भारतात लसीकरण मोहिमेला वेग आणण्याची नितांत गरज अनेकांनीच व्यक्त केली आहे. याच धर्तीवर मुंबईसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या आणि दाटीवाटी असणाऱ्या शहरामध्ये कोरोना प्रतिबंधक लसींची पुरेशी उपलब्धता व्हावी, यासाठी महापालिकेला महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहे. सध्या कोरोना प्रतिंबधक लसीसाठी स्मार्टफोनद्वारे संबंधीत ॲपवर नोंदणी करावी लागते. पण या तंत्रज्ञानाची माहिती नसलेले नागरिक तसेच जे कोविन अॅप ऑपरेट करू शकत नाहीत अशा नागरिकांनाही लस सुलभरित्या मिळावी याकरिता एक पद्धती तयार करण्यावर देखील आम्ही काम करत आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
मुंबईची लसींची गरज पाहता शहरात लसीकरण केंद्र वाढवण्यासाठी पालिका आणि प्रशासन प्रयत्नशील आहे. मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्यासह शहरातील प्रत्येक पालिका झोनमध्ये एक ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी घेतला आहे. यासंदर्भात तातडीने अंमलबजावणी झाल्यामुळं आता शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढली आहे. शिवाय ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीमेमुळे ज्येष्ठ नागरिकांना लस सुलभरित्या मिळण्यासाठी मदत होत आहे.
गृहनिर्माण सोसायटी आणि रुग्णालयांच्या सहभागातून सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये लसीकरण राबविण्याच्या धोरणासाठी मार्गदर्शक सूचनाही महापालिकेने नुकत्याच जारी केल्या आहेत, असं सांगच राज्यातीतील इतर सर्व शहरांनीही ६५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे सुलभरित्या लसीकरण होण्याच्या दृष्टीने त्या त्या शहरांमध्ये ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीम घ्यावी, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.