Top Newsराजकारण

एसटी डेपोचे भूखंड गिळंकृत करण्यासाठीच संपावर तोडगा निघत नाही : चंद्रकांत पाटील

मुंबई: एसटी डेपोंच्या भूखंडावर काही लोकांचा डोळा आहे. हे भूखंड लाटण्यासाठीच हा सर्व प्रकार सुरू असून म्हणूनच एसटीच्या संपावर तोडगा निघत नाही, असा गंभीर आरोप करतानाच मुख्यमंत्र्यांनी कधी जमिनी लाटल्या नाहीत. त्यामुळे या भूखंड लाटण्यासाठी हा प्रकार सुरू आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या सरकारला एसटीचं नेटवर्क मोडून काढायचं आहे. कुण्यातरी प्रायव्हेट वाहतूकवाल्यांशी बहुदा यांचं काँट्रॅक्ट झालं आहे. हे सगळे मोठ मोठे डेपो विकायचे आहेत. जमिनीवर डोळा असणारेच हे लोक आहेत. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही कधी जमिनी लाटल्या नाहीत. हे जमिनी लाटण्यासाठी सुरू आहे हे तुम्हाला नाही कळणार, असं पाटील म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी परिवहन मंत्री अनिल परब एका निमित्ताने आले होते. त्यावेळी चर्चा झाली. तेव्हा प्रश्न कसा सोडवायचा हे फडणवीस आणि मी समजावून सांगितलं होतं. तुम्ही अतिशय योग्य सांगितलं. मी उद्धवजींशी बोलतो, असं त्यावेळी तुम्ही म्हणाला होता. उद्धवजी त्यांना बोलायला उपलब्ध आहेत की नाही मला माहीत नाही. पण हा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो. त्यांना सरकारी कर्मचारी म्हणणं तात्पुरतं पेंडिग ठेवता येईल. पण तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देतो असं म्हणाना बाबा. उद्याचे हे कर्मचारी तुमच्या खिशात हात घालणार आहे का? असा सवालही त्यांनी केला.

बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा अशी होती की, घरी अन्याय झालेली स्त्री आली की चलो इनके साथ जाओ और देखो, असं ते सांगायचे. इथे ७०-८० हजार कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आणि तुम्ही गप्प बसलेला आहात. हे बाळासाहेबांच्या आत्म्याला न आवडणारं आहे, असं त्यांनी सांगितलं.

अमरावतीच्या महापौरांवर दबाव असेल

अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अमरावतीच्या महापौरांवर सुद्धा शासनाचा दबाव असेल. भाजपची सत्ता असताना भाजपच्या महापौरांनी हा प्रकार केला असेल तर मी त्याचा निषेध व्यक्त करतो. परंतु, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा भाग म्हणून पुतळा काढण्याचं दुर्देवी काम सुरू आहे. महाराष्ट्र या सरकारला क्षमा करणार नाही, असं ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button