Top Newsस्पोर्ट्स

तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा ७ गडी राखून विजय; मालिकाही जिंकली

भारताचे मालिका जिंकण्याचे स्वप्न अपुरेच !

केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न याहीवेळेस अपुरे राहिले. तिसऱ्या आणि शेवटचा निर्णायक कसोटी सामना दक्षिण अफ्रिकेनं ७ गडी राखून जिंकला. भारतानं दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेनं ३ गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह दक्षिण अफ्रिकेनं ही मालिका २-१ ने जिंकली आहे. भारताने कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर जोरदार कमबॅक करत दक्षिण अफ्रिकेने सलग दोन सामने जिंकले. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाचं दक्षिण अफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. पहिल्या डावात भारताने सर्व गडी गमवून २२३ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण अफ्रिकन संघाने सर्वबाद २१० धावा केल्या. भारताला १३ धावांची आघाडी मिळाली. भारताने दुसऱ्या डावात १९८ धावा केल्या आणि दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचं आव्हान ठेवलं होतं.

https://twitter.com/OfficialCSA/status/1481978161512525824

दुसऱ्या कसोटीत विराट कोहली जायबंदी झाला अन् त्याच्या अनुपस्थितीचा डाव साधून दक्षिण आफ्रिकेनं मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. तिसऱ्या कसोटीत विराटचे दमदार पुनरागमन झाले, परंतु अन्य सहकाऱ्यांनी माना टाकल्या. किगन पीटरसन हा आफ्रिकेच्या विजयाचा नायक ठरला. आफ्रिकेनं ०-१ अशा पिछाडीवरून ही मालिका जिंकली.

https://twitter.com/OfficialCSA/status/1481908832439779330

रिषभ पंतच्या नाबाद शतकानं भारताला विजयाच्या आशा दाखवल्या होत्या, परंतु आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर व पीटसरन या जोडीनं त्या मावळून टाकल्या. आफ्रिकेच्या फलंदाजांची एकाग्रता भंग करण्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानं सारे प्रयत्न करून पाहिले. पण, त्याचा फार उपयोग झाला नाही, उलट विराट नेमका कोणता आदर्श ठेऊ इच्छितो असा सवाल अनेकांनी केला. लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांचे अपयश अन् आर अश्विन व शार्दूल ठाकूर या अष्टपैलू खेळाडूंच्या बॅटीनं दिलेला दगा भारताला महागात पडला.

रिषभनं ४ बाद ५८ धावांवरून टीम इंडियाचा डाव सावरताना विराटसोहत ९४ धावांची भागीदारी केली. विराट माघारी परतला अन् भारतीय फलंदाजांनी रांग लावली. भारताचा दुसरा डाव १९८ धावांवर गडगडला. त्यात रिषभच्या नाबाद १०० धावा होत्या. त्यानं १३९ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या . भारतानं दुसऱ्या डावात १९८ धावा करताना आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले.

एडन मार्कराम (१६) याला माघारी पाठवून शमीनं भारताला विजयाचे स्वप्न दाखवले. पण, एल्गर व किगन पीटरसन यांनी त्या स्वप्नांचा चुराडा केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. एल्गर ९६ चेंडूंत ३० धावा केल्या. इथून आफ्रिका पराभूत होणे अशक्यच होते. पीटरसननं या सामन्यावर वर्चस्व गाजवताना एकहाती सामना फिरवला. चेतेश्वर पुजारानं त्याला जीवदान देऊन भारताचा विजयाचा दरवाजा बंद केला. पीटरसननं आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली अन् व्हॅन डेर ड्युसेनसह तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली.

शार्दूल ठाकूर पुन्हा एकदा पार्टनरशीप ब्रेकर ठरला. त्यानं भारताला महत्त्वाची विकेट मिळवून देताना पीटरसनचा त्रिफळा उडवला. पीटसरन ११३ चेंडूंत १० चौकारांसह ८२ धावांवर माघारी परतला. पॅव्हेलियनच्या दिशेनं पीटरसनचं साऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात उभं राहुन कौतुक केलं. या विकेटनं भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या, पण ड्युसेन व टेम्बा बवुमानं तसं होऊ दिले नाही. या दोघांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेला ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. वबुमा ३२, तर ड्युसेन ४१ धावांवर नाबाद राहिले.

मालिका विजयाचं गुपित आफ्रिकन कर्णधाराने उलगडलं

मालिका विजयामागचं नक्की गुपित काय असा प्रश्न अनेकांना पडला. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याचं उत्तर दिलं. भारतावरील आमचा हा विजय खूपच आनंददायी आहे. या विजयाचा आनंद दीर्घकाळ राहील. भारतासारख्या तुल्यबळ संघाला पराभूत करणाऱ्या आफ्रिकन संघाचा मला अभिमान आहे. सर्वच खेळाडूंनी उत्तम खेळ केला. आम्ही जेव्हा पहिली कसोटी गमावली त्यावेळीही मला विश्वास होता की आम्ही ही मालिका नक्की जिंकू शकतो. पुढील दोन सामन्यात मी आमच्या संघातील खेळाडूंना शांत आणि संयमी खेळ करण्याचा सल्ला दिला होता आणि त्यांनी दमदार खेळी करून दाखवली. शेवटच्या दोन कसोटी सामन्यात आम्ही एक संघ म्हणून खेळलो. एकत्रित प्रयत्नांनी काय घडू शकतं याची प्रचितीच आम्हाला आली आणि त्यामुळेच मी खूप आनंदी आहे, असं या मालिका विजयामागचं कारण कर्णधार डीन एल्गरने सांगितलं. म्हणाला.

तुमच्या संघातील खेळाडूंना आव्हान देण्यासाठी त्यांनी तशा प्रकारचा खेळ करणं गरजेचं असतं. आमच्या गोलंदाजांनी जी कामगिरी संपूर्ण कसोटी मालिकेत केली त्याबद्दल मी खुश आहे. मी पहिल्या कसोटीनंतर माझ्या संघातील खेळाडूंना सांगितलं होतं की सगळ्यांना उत्तम खेळ करावा लागेल. सर्वच खेळाडूंनी त्यानुसार कामगिरी करून दाखवली, असं एल्गर म्हणाला.

मला नव्या दमाच्या युवा संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आमचा संघ हळूहळू अनुभवातून शिकत आहे. संघात मोठी नावं नसताना तुल्यबळ संघाला पराभूत करण्याचा पराक्रम करणं खूपच आनंददायी आहे. आमच्या विजयामुळे मला आता खूप सकारात्मकता मिळाली आहे. याच सकारात्मकतेतून पुढील क्रिकेट मालिका खेळण्याकडे आमचा कल असेल, असंही एल्गरने स्पष्ट केलं.

एकाग्रता हरवल्याचा भारताला फटका : विराट कोहली

या सामन्यानंतर विराट कोहलीनं या पराभवामागचं कारण सांगितलं. ही दर्जेदार कसोटी मालिका ठरली. पहिला सामना आमच्यासाठी चांगला गेला, परंतु दक्षिण आफ्रिकेनं अविश्वसनीय पुनरागमन केलं. एकाग्रता हरवल्याचा फटका आम्हाला बसला आणि त्यांनी तिच संधी हेरली. ते या जेतेपदाचे खरे मनसबदार आहेत. परदेशात मिळणाऱ्या संधीचं सोनं करा, हे मी आधीच सांगितलं होतं. आम्ही जेव्हा जेव्हा संधी हेरली तेव्हा परदेशात मालिका जिंकली, परंतु यावेळेस आम्ही अपयशी ठरलो, असे विराट म्हणाला.

त्यानं पुढे सांगितले, मोक्याच्या क्षणी उडालेली घसरगुंडी महागात पडली. फलंदाजांच्या अपयशामुळे ही मालिका गमावली, या व्यतिरिक्त दुसरे कारण असू शकत नाही. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आमच्यावर दडपण निर्माण करण्यात यश मिळवलं आणि त्यातूनच चुका झाला. फलंदाजीच्या बाबीवर आता लक्ष द्यायला हवं, त्यापासून पळून चालणार नाही. आम्ही यंदा आफ्रिकेला नमवू अशी लोकांची अपेक्षा होती. पण, आम्ही ते करू शकलो नाही. प्रतिस्पर्धी संघाला या यशाचं श्रेय द्यायला हवं.

अखेरच्या दोन्ही कसोटींत फलंदाजांनी निराश केले. रहाणे व पुजारा यांच्या भविष्याबाबत सांगणे अवघड आहे. आम्हाला आता निवड समितीसोबत बसून बोलावे लागेल. या दोघांनी अनेकदा संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी हे दोघं दमदार खेळले आहेत, असेही विराट म्हणाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button