
१) पक्ष प्रवक्ता पदासाठी उमेदवार पाहिजे –
अ) शैक्षणिक पात्रता – हे पद राजकीय असल्यामुळे कोणत्याही शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही, मात्र अर्ज करतेवेळी उमेदवार निदान जन्मतारखेनुसार तरी सज्ञान असावा.
ब) अनुभव व इतर आवश्यक गुण – उमेदवाराला बेताल बोलण्याची सवय असावी. असे एखादे बेताल वक्तव्य केल्यानंतर झालेला अपमान चेहऱ्यावर न दाखवता परत पत्रकारांना सामोरे जाण्याइतका कोडगेपणा उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. उमेदवाराची भाषा ही नेहमीच अरेरावीची आणि आव्हानात्मक असावी. उमेदवाराचे दिसणे हे शक्यतो सभ्य माणसासारखे नसावे. आपली आर्थिक सुबत्ता दाखविण्यासाठी जॅकेट वगैरे घातले तरी गल्लीतल्या गुंडासारख्या शर्टाच्या बाह्या दुमडण्याची अंगभूत प्रवृत्ती असावी. चष्म्यातून न बघता चष्म्याच्यावरून मारक्या म्हशीसारखे समोरच्याकडे बघता येणे ही विशेष अहर्ता मानली जाईल. उमेदवाराला बोलतांना ( विशेषतः पत्रकारांशी ) आपल्या भुवया उडवता यायला हव्यात. उमेदवार फाटक्या शरीरयष्टीचा असला तरी त्याच्या तोंडात भरपूर जोर असावा.
क) करावयाचे कार्य – पत्रकारांशी बोलतांना आमच्या पक्षाची असलेली नसलेली बाजू समर्थपणे उचलून धरावी लागेल. आपण काल जे बोललो होतो त्याच्या एकदम विरुद्ध अर्थी आज बिनदिक्कतपणे बोलावे लागेल. आमचा पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षात अस्वस्थता पसरेल अशी विधाने करण्याची उमेदवाराला पूर्ण मुभा असेल ,पण त्यानंतर एखाद्या ‘मिनिस्टर इन वेटींग’ने अपमान केल्यास त्यास उमेदवारच सर्वस्वी जबाबदार
राहील. अल्पमतात असतांनाही आमच्या पक्षाचे सरकार स्थापन व्हावे म्हणून उमेदवाराला कोणा जेष्ठ नेत्याच्या घरी खेटे घालावे लागले तरी ते हसत हसत घालावे लागतील. उमेदवाराने केलेल्या कामाची दखल पक्षाकडून योग्यवेळी घेतली जाईल ,पण त्यापोटी उमेदवाराच्या भावाला मंत्रिपद देण्यास पक्ष बांधील राहणार नाही.
२) पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिकासाठी संपादक पाहिजे –
अ) शैक्षणिक पात्रता – आमचा वाचकवर्ग आणि पक्षकार्यकर्ते यांच्या शैक्षणिक पात्रतेचा अभ्यास करून कमीतकमी दहावी उत्तीर्ण ( कितव्या प्रयत्नात हा भाग गौण असेल) ही शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे, पण इतर आवश्यक गुण व अनुभव यांचा विचार करून ती शिथिल केली जाऊ शकते.
ब) अनुभव व इतर आवश्यक गुण – या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने या आधी कोणत्यातरी वर्तमानपत्रात काम केलेले असावे. ( योग्य तसा अनुभवी उमेदवार न मिळाल्यास वृत्तपत्राच्या पार्सल विभागात काम केलेल्या उमेदवाराचाही विचार केला जाऊ शकतो.) संध्याकाळी कट्ट्यावर बसून एखाद्या राजकीय पक्षाच्या आपल्यालाही न समजलेल्या भूमिकेवर , दुसऱ्यांनाही न समजणाऱ्या भाषेत तावातावाने टीका करणाऱ्या ‘ कट्टावीरा’च्या आविर्भावात अग्रलेख लिहू शकणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
क) करावयाचे कार्य – ज्यांची आपण आपल्या अग्रलेखात पेनची शाई संपेपर्यंत स्तुती केली, त्यांचीच निंदानालस्ती करणारा लेख थोड्याच दिवसात लिहावा लागेल. वृत्तपत्र मालकांची प्रतिमा सुधारावी म्हणून त्यांची ‘ महामॅरेथॉन मुलाखत’ घ्यावी लागेल. ही मुलाखत पुढे ‘ महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात दाखवली जाऊन त्यातून निदान एका रविवारच्या पुरवणीचा खर्च तरी भागेल या पद्धतीने घ्यावी लागेल.
पक्षाचे मुखपत्र दैनिक स्वरूपात चालवायचे म्हणजे विरोधकांच्या विरोधात ( राजकारणात कालचे मित्र आजचे विरोधक आणि कालचे विरोधक आजचे ‘टेकू’ असू शकतात याचे भान ठेवून) रोजच ‘ सामना’ खेळावा लागणार आहे. हा ‘सामना’ कब्बड्डीच्या सामन्यासारखा असावा, म्हणजे विरोधकांना घाबरवण्यासाठी त्यांच्या अंगावर जायचे आणि ऐनवेळी माघार घेऊन परत आपल्या हद्दीत पळून यायचे ! हा ‘सामना’ गल्लीतल्या विटीदांडू सारखा नसावा,म्हणजे विटी हवेत उडतेय एकीकडे आणि दांडू हवेत फिरतोय दुसरीचकडे !
विरोधीपक्ष नेत्याला तुमची ‘मॅरेथॉन मुलाखत’ घ्यायची आहे असे आमिष दाखवून पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलवावे लागेल आणि तिथल्या जेवणाचे बिल विरोधीपक्ष नेत्यालाच देणे भाग पाडावे लागेल. ( वृत्तपत्राच्या कार्यालयातून हे बिल खर्ची पाडता येणार नाही.)
विशेष सूचना – वरील दोन्ही पदांसाठी एकच उमेदवार पात्र ठरल्यास त्यास पक्षाकडून मागील दाराने लोकप्रतिनिधी बनविले जाईल. निवडीचे सर्वाधिकार राखून ठेवलेले आहेत.