Top Newsफोकसस्पोर्ट्स

शुभमन गिलचे ऐतिहासिक दुहेरी शतक; भारताच्या पहिल्या डावात ५८७ धावांचा डोंगर

इंग्लंडला तीन धक्के, दुसऱ्या दिवसअखेर २० ओव्हरमध्ये ३ बाद ७७ धावा

एजबस्टन : एजबस्टनच्या ऐतिहासिक मैदानावर भारतीय क्रिकेट संघाचा नवा कर्णधार शुभमन गिल याने आपल्या खेळातून नवा इतिहास रचला आहे. नेतृत्वाच्या पहिल्याच कसोटी मालिकेत, गिलने केवळ नेतृत्वाचाच नाही तर फलंदाजीतही आपली गुणवत्ता सिद्ध करत इंग्लंडमध्ये दुहेरी शतक (२६९ धावा) ठोकण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे, इंग्लंडमध्ये कसोटीत दुहेरी शतक झळकावणारा तो पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे. दरम्यान, दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारताच्या संघानं ५८७ धावांपर्यंत मजल मारली. यामध्ये शुभमन गिलनं २६९ धावा केल्या तर रवींद्र जडेजानं ८९ धावा केल्या. भारताचा डाव संपल्यानंतर वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडला तीन धक्के दिले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं २० ओव्हरमध्ये ३ बाद ७७ धावा केल्या होत्या. जो रुट १८ आणि हॅरी ब्रुक ३० धावांवर फलंदाजी करत होते.

गिलने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ३११ चेंडूत २१ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २०४ धावांची भक्कम खेळी साकारली. लीड्सच्या पहिल्या कसोटीत १४७ धावांची झुंजार खेळी साकारलेल्या गिलने इंग्लंडमधील कसोटीत भारतीय कर्णधाराने केलेल्या सर्वाधिक धावांचा मोहम्मद अझरुद्दीन यांच्या १७९ धावांचा विक्रमही मोडीत काढला. शिवाय, १२५ व्या षटकात सलग तीन चौकार खेचत गिलने आपला स्कोर २२२ पर्यंत नेला. इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुनील गावसकर आणि राहुल द्रविड यांच्या नावावर होता. सुनील गावसकर यांनी १९७९ मध्ये २२१ धावा केल्या होत्या तर राहुल द्रविडच्या नावावर २१७ धावांची नोंद होती. शुभमन गिलनं हा रेकॉर्ड देखील मोडला. यानंतर शुभमन गिलनं विराट कोहलीचा कॅप्टन म्हणून २५४ धावांचा विक्रम मोडला. गिलचा हा पराक्रम फक्त वैयक्तिक नाही, तर भारतीय क्रिकेटसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे.

शुभमन गिल कसोटीत दुहेरी शतक करणारा २६ वा भारतीय फलंदाज ठरला असून, ही भारतीय कसोटी इतिहासातील ५० वी दुहेरी शतकी खेळी आहे. भारताच्या डावाला बळकट करणाऱ्या गिलच्या खेळीमुळे संपूर्ण संघाला आत्मविश्वास मिळाला असून, सामना सध्या भारताच्या नियंत्रणात आहे. कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत अशी जबरदस्त खेळी साकारून गिलने आपल्या नेतृत्वाची ठाम छाप जगभरात उमठवली आहे. भारतीय क्रिकेटचा नवा चेहरा ठरत असलेला शुभमन गिल, केवळ भविष्यातील आशा नाही, तर वर्तमानातही भारतीय संघाचा आधारस्तंभ ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शुभमन गिलनं रवींद्र जडेजाच्या साथीनं २०३ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजानं ८९ धावा करत शुभमन गिलला साथ दिली. शुभमन गिलनं रवींद्र जडेजा बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर यांच्या सोबत भागीदारी केली. वॉशिंग्टन सुंदर यानं ४२ धावा केल्या.

इंग्लंडला तीन धक्के

भारताचा डाव ५८७ धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडचा संघ फलंदाजीला मैदानात आला. जसप्रीत बुमराहला विश्रांती दिल्यानं आकाशदीपला संधी देण्यात आली होती. आकाशदीपनं इंग्लंडला तिसऱ्या ओव्हरमध्येच दोन धक्के दिले. बेन डकेट आणि ओली पोपची विकेट आकाशदीपनं काढली. यानंतर क्रॉलीची विकेट मोहम्मद सिराजनं काढली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं २० ओव्हरमध्ये ३ बाद ७७ धावा केल्या होत्या. जो रुट १८ आणि हॅरी ब्रुक ३० धावांवर फलंदाजी करत होते.

भारताला विजय आवश्यक

भारतानं पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारला होता. अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफीमधील हेडिंग्ले येथील लीडस वरील कसोटी भारतानं गमावली होती. त्यामुळं इंग्लंडनं मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. भारतानं पहिल्या डावात ५८७ धावांचा डोंगर उभा केल्यानं संघ मजबूत स्थितीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button