
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. कोरोना संसर्ग झाला असला तरी काळजी करण्याची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरु असल्याची माहिती पवार यांनी दिली आहे. तर, गेल्या काही दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि काळजी घ्यावी, असं शरद पवार यांनी आवाहन केलं आहे.
माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही.
गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 24, 2022
कोरोना काळात शरद पवार यांनी राज्यात विविध ठिकाणी सरकारच्या नियमांंचं पालन करत दौरे केले होते. गेले दोन दिवस शरद पवार पुणे आणि बारामतीमध्ये होते. मुंबईत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, सदानंद सुळे आणि रेवती सुळे यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाला होता. राज्य महिला आयोगाच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त २५ जानेवारीला मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांना कोरोना संसर्ग झाल्यानं ते अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.




