Top Newsराजकारण

थिअटर्स सुरु करण्यासाठी शिवसेना खासदाराच्या जावयाची दलाली; शेलारांचा आरोप

मुंबई : राज्यातील थिअटर्स सुरु करण्यासाठी शिवसेनेच्या खासदाराचा जावई सरकारच्या वतीने वाटाघाटी करत असल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. तसंच, ठाकरे सरकार निर्बंधांचं राजकारण करत असल्याचा आरोप देखील शेलार यांनी केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यातील थिअटर्स सुरु करण्यासाठी शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदाराचा जावई ठाकरे सरकारच्या वतीने वाटाघाटी करत आहे. एक-एक सेक्टर वाटाघाटीने सुरु करु, असा धंदा सुरु आहे, असा खळबळजनक आरोप शेलार यांनी केला. तसंच, शिवसेनेच्या जावयाने हे धंदे बंद करावेत, असा इशारा शेलार यांनी दिला आहे.

ठाकरे सरकारने निर्बंधांचा धंदा सुरु केला आहे. रेस्टॉरंट्सवाले भेटले वाटाघाटी झाल्या अन् रेस्टॉरंट्स उघडी झाली असा आरोप शेलार यांनी केला. मराठी कलावंत, नाट्य कलावंत आंदोलन करताहेत, पण बंदी. पबवाले भेटले, वाटाघाटी झाल्या पब सुरू झाले. डिस्को, फाईव्ह स्टारवाल्यासोबत वाटाघाटी झाल्या त्यांनाही परवानगी. त्यामुळे शिवसेना आता गणेशोत्सव मंडळ, दहीकाला उत्सव मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ यांच्याशी वाटाघाटी करणार का? असा सवाल शेलार यांनी केला.

गोविंदा लादेन आहेत का?

सचिन वाझेचा प्रश्न सभागृहात मांडला, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझे लादेन आहे का? असा सवाल केला होता. मग आता आम्हाला सांगा हे गोविंदा लादेन आहेत का? त्यांना अटक केली जात आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. पुढे बोलताना त्यांनी दीड-दोन वर्षात महाराष्ट्र बंदीवान केल्याचा विक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे लिहिला जाईल, असं म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणतात आमचा सणांना नाही, तर कोरोनाला विरोध आहे. मग पब, बार इथे गर्दी होत नाही का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला. केंद्राचं पत्र दाखवता मग केंद्राच्या पत्रात पब, बार इथे गर्दी होत नसल्याचं म्हटलंय का? असा देखील सवाल शेलार यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button