सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आढळलेल्या दुर्मिळ वनस्पतीला शरद पवारांचे नाव – ‘अर्जेरिया शरदचंद्रजी’
कोल्हापूर : कोल्हापुरातील दोन वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. विनोद शिंपले आणि डॉ. प्रमोद लावंड यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये एका दुर्मिळ वनस्पतीचा शोध घेतला आहे. या वनस्पतीला त्यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही वनस्पती ‘अर्जेरिया शरदचंद्रजी’ या नावाने ओळखली जाणार आहे. शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत कृषी क्षेत्रासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल या दोन्ही संशोधकांनी नव्या वनस्पतीला पवारांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ. विनोद शिंपले हे गेली वीस वर्षे गारवेल कुळातील वनस्पतींच्या अभ्यासासाठी जगात नावाजले गेले आहेत. नवी वनस्पती देखील याच कुळातील असल्याचे शिंपले यांनी सांगितले. शिंपले यांनी आजवर पाच नव्या गारवेल कुळातील वनस्पतींचा शोध लावला आहे. डॉ. शिंपले आणि डॉ. लावंड यांनी शरद पवारांचा आगळावेगळा सन्मान केल्याबद्दल राष्ट्रवादीच्या खासदार आणि पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी दोन्ही संशोधकांचे आभार व्यक्त केले आहेत.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आढळणा-या एका वनस्पतीचा शोध डॉ. विनोद शिंपले आणि डॉ. प्रमोद लावंड यांनी लावला असून त्याला आदरणीय शरद पवार साहेबांचे नाव दिले आहे. आता ही वनस्पती अर्जेरिया शरदचंद्रजी या नावाने ओळखली जाईल. या दोन्ही संशोधकांचे मी मनापासून आभार मानते, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे. यासोबतच महाराष्ट्र हे आपले कुटुंब आहे असे आदरणीय साहेब मानतात. असा आदर आणि सन्मान केवळ कुटुंबातच होऊ शकतो. या दोन्ही संशोधकांनी नव्या वनस्पतीचे संशोधन साहेबांच्या नावे समर्पित केले. याचा मला नितांत आदर आहे. धन्यवाद, असेही त्या पुढे म्हणाल्या.