राजकारण

शरद पवार मैदानात! कोरोना संकटात शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांना मदत देण्याचा सरकारला सल्ला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन मोठ्या शस्त्रक्रियांनंतर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी कोरोना संकटाच्या काळात काही घटकांना मदत करण्याचा सल्ला दिला आहे. राज्यातील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मदत द्या, असा सल्ला पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी आपल्या निवासस्थानी पुन्हा एकदा कामकाजाला सुरुवात केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी काही वेळापुर्वी फेसबुक लाईव्ह केलं. त्यात पवार आपल्या निवासस्थानी कार्यकर्ते आणि काम घेऊन आलेल्या लोकांना भेटत आहेत. त्यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेत काही सूचनाही करत असल्याचं या फेसबुक लाईव्हमध्ये पाहायला मिळत आहे.

शरद पवार यांच्यावर नुकतीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही.

ही शस्त्रक्रिया ३१ मार्चला होणार होती. मात्र, आदल्या दिवशी संध्याकाळपासून शरद पवार यांच्या पोटात प्रचंड दुखायला लागले होते. त्यामुळे शरद पवार यांना २९ मार्चला रात्रीच ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ब्रीच कँडीमधील विशेष डॉक्टरांच्या पथकाने अर्धा तासांच्या शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांच्या पित्तनलिकेतील खडा एन्डोस्कोपीद्वारे बाहेर काढला. डॉ. अमित मायदेव यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली. डॉक्टरांच्या या पथकात डॉ. गोलवाला, डॉ. प्रधान, डॉ. दफ्तरी, डॉ. समदानी, डॉ. टिबरेवाला यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button