
1) बंगाल दिल्लीतल्या दोन गुंडांच्या हातात देणार नाही – ममता बॅनर्जी
@ अजिबात देऊ नका . निदान गुंड तरी लोकलच असावेत !
2) फार्मा कंपनीच्या मालकाला सोडवायला फडणवीस दरेकरांची मध्यरात्री धाव – सामनातील बातमी
@ देवा ! देवा !! देवा !!! या लोकांकडे काही नितीमत्ताच राहिली नाही. एकवेळ संजय दत्तसारख्या देशभक्ताला सोडवणे समजू शकते , पण फार्मा कंपनीच्या देशद्रोही मालकाला सोडवता म्हणजे काय ?
3) राजकारण कुठे करावं आणि कुठे करू नये याबाबत एखादा नैतिकतेचा धडा शालेय क्रमिक पुस्तकात
असावा असे वाटते – संजय राऊत
@ हो , पण त्यासाठी तुम्हाला शाळेत गेलेल्यांना तिकिटं द्यावी लागतील ना !
4) सरकार पडण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही -एकनाथ खडसेंंनी उडवली खिल्ली
@ लंगडं हसतंय पांगळ्याला ! तुमचं तरी मंत्री बनण्याचं स्वप्नं कुठे पूर्ण झालं ?
5) आमच्या सरकारचा प्रत्येक निर्णय वैज्ञानिक व वैद्यकीय आधारावर – आदित्य ठाकरे
@ अरे व्वा ! कुठल्या कंपाऊंडरचा सल्ला घेता ?
6) मला जर करोनाचे जंतू सापडले असते , तर ते मी फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते – शिवसेना आमदार संजय गायकवाड
@ यांना तोंडाचा डायरिया झालेला दिसतो !
7) उध्दव ठाकरेंनी पीपीई किट घालून बाहेर पडावं – चंद्रकांत पाटील
@ नको . नको. असं काही केलं तर ते सीबीआयवाले त्यांनाही पीपीई किट घालून ‘अँटेलिया’ समोरून चालायला लावतील !
8) फडणवीस दिल्लीत जाऊन बसले तर जास्त मदत करू शकतात – बाळासाहेब थोरात
@ लग्न आपण करायचं आणि अपत्य प्राप्तीसाठी शेजाऱ्याकडे डोळे लावून बसायचं !
9) पुतण्याच्या लसीकरणावरून देवेन्द्र फडणवीस आले वादात – एक बातमी
@ पुतण्या कोणाचाही असो तो काकाला अडचणीत आणल्याशिवाय राहत नाही.
10) अमित शहा म्हणजे ब्रम्हदेव नव्हे – जितेंद्र आव्हाड
@ एकदा बारामतीकरांना विचारून तर पहा .
11) अजित पवार ‘ नॉट रिचेबल’ नेते आहेत. – चंद्रकांत पाटील
@ अहो , तुमचीच गँग त्यांना नादी लावते म्हणून त्यांना ‘ नॉट रिचेबल’ व्हावं लागतं आणि वर तुम्हीच त्यांची टिंगलटवाळी करता ?
12) माझ्यावर असा आरोप करणाऱ्यांचा मेंदू तपासायला हवा – अजित पवार
@ संजय राऊतांना सांगा , ते पाठवतील एखादा कंपाऊंडर.
13) भाजपचे नेते बेजबाबदार – नाना पटोले
@ आपल्याकडून जबाबदारी पेलवली जात नाही म्हणून दुसऱ्याला बेजबाबदार म्हणणं तुम्हालाच जमू शकतं .
14) जास्तीच्या ऑक्सिजनसाठी केंद्राच्या पाया पडायलाही तयार – आरोग्यमंत्री राजेश टोपे
@ सरकार बनविण्यासाठी तुमच्या नेत्यांनी त्यांच्या तंगडीत तंगडी घालून त्यांना पाडलं . आता त्यांच्याच पाया पडता ?
15) देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राशी दोन हात करायला पुढे यावे – नाना पटोले
@ आरोग्यमंत्री पाया पडतो म्हणतात . तुम्ही दोन हात करायचं म्हणतात ! हाच का तुमचा किमान समान कार्यक्रम ?
16 ) पंधरा वर्षात कपड्यांचा वापर दुप्पट – एक अहवाल
@ यांनी हिंदी चित्रपटांचा अभ्यास केलेला दिसत नाही !
17 ) परिक्षेविना उत्तीर्ण करणे उचित नाही – तज्ज्ञांचे मत
@ अहो, निवडून आल्याशिवाय जर कोणी पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनलेलं चालत असेल , तर परिक्षेविना मुलांना एक वर्ष उत्तीर्ण करणं कसं अनुचित ठरवणार ?
18 ) सिरमचे अदर पुनावाला हे डाकूपेक्षाही वाईट – उत्तर प्रदेशचे भाजप आमदार राधामोहनदास आगरवाल
@ मग पुढच्या निवडणुकीत तुमच्या पक्षाकडून त्यांचं तिकीट पक्क समजायचं ?
19 ) राज्यात गेल्या वर्षभरात ऑक्सिजनचा एकही प्लँट नाही -एक बातमी
@ अहो , सरकारच ऑक्सिजनवर असल्यावर दुसरं काय होणार ?
20) ऑक्सिजन, रेमडेसीविर तुटवड्याला केंद्र सरकार जबाबदार – छगन भुजबळ
@ अहो, तुमचं सरकार यायलाही तर केंद्र सरकारच जबाबदार आहे ! त्यांनी फडणवीसांना थोडी मोकळीक दिली असती तर – – –
(लेखकाचा संपर्क – 7875077728)




