राजकारण

संजय राऊतांचा नाना पटोलेंवर जोरदार पलटवार

जिल्हा-तालुका स्तरावरील नेत्यांनी राष्ट्रीय पातळीवरील विषयात पडू नये

नवी दिल्ली: संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) अध्यक्षपदाचा विषय हा केंद्रातील चर्चेचा विषय आहे. राज्यातील किंवा जिल्हा-तालुका स्तरावरील नेत्यांनी यावर बोलू नये, असा शब्दांत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना प्रत्युत्तर दिले. UPA विषयी बोलण्यासाठी त्याचा भाग असलंच पाहिजे, हे गरजेचे नाही. या देशात भाजपविरोधात विरोधी पक्षांची मजबूत आघाडी उभी करायची असेल तर UPA विषयी चर्चा झाली पाहिजे. ही गोष्ट महाराष्ट्रातील नेत्यांना उमजत नसेल तर त्यांना अभ्यास करण्याची गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी UPA चे अध्यक्षपद शरद पवार यांना मिळावे, अशी मागणी केली होती. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल विचारला होता. तसेच शिवसेना UPA चा भाग नाही, त्यामुळे संजय राऊत यांनी संबंध नसलेल्या विषयाबाबत बोलू नये, असे खडे बोलही सुनावले होते.

या टीकेला संजय राऊत यांनी नाना पटोले यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले. हा दिल्लीतील विषय आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी यामध्ये पडू नये. सोनिया गांधी किंवा राहुल गांधी याविषयी काही बोलले तर आम्ही उत्तर देऊ. देशात विरोधी पक्षांची सक्षम आघाडी उभी राहिली नाही तर भाजपचा पराभव कसा करणार, याचं उत्तरही या नेत्यांनी दिल्लीत बसून द्यावं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. त्यामुळे आता यावर नाना पटोले काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

काँग्रेसने यूपीएच्या अध्यक्षपदाचा हट्ट न सोडल्यास राष्ट्रीय स्तरावरील काही नेते यूपीए 2 स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. हीच चिंता असल्याने मी यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी केली. पण काँग्रेस पक्षाशिवाय यूपीए असूच शकत नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button