Top Newsराजकारण

संजय राऊत झुकत नाहीत, म्हणून कुटुंबाला धमक्या !

पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरुंगात जायला आणि मरायलाही तयार, सोमय्यांच्या आरोपांना थेट उत्तर

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरु आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत सध्या गोव्यात आहेत. अशावेळी भाजप नेते आणि माजी खा. किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. बुधवारी सक्तवसुली संचलनालयाने त्यांना पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणात ईडीने राऊतांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावरही छापा टाकलाय. त्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी राऊतांना थेट इशारा दिला आहे. सोमय्यांच्या या इशाऱ्याला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरुंगात जायला आणि मरायलाही तयार असल्याचं वक्तव्य केलंय.

अनेक वर्षापासून माझ्याविरोधात षडयंत्र रचलं जात आहे. माझ्या कुटुंबाला त्रास दिलो जातोय. माझे नातेवाईक, माझा मित्र परिवार, माझे सहकारी यांना केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे त्रास दिला जातोय. पण त्याची पर्वा करत नाही. मी माझ्या पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरुगांत जायला आणि मरायलाही तयार आहे. मी काळजी करत नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. तसंच सुजित पाटकर हे माझे नातेवाईक आहेत. तुम्ही कोण आहात? बघून घेऊ आम्ही. अत्यंत खालच्या स्तरावरील राजकारण सुरु आहे. संजय राऊत झुकत नाहीत, वाकत नाहीत, मग कुटुंबाला धमक्या द्यायच्या, बदनामी करायची, केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणायचा. पण करु द्या, २०२४ पर्यंत हे चालेल, २०२४ नंतर पत्ते उलटे पडलेले असतील, असा दावाही संजय राऊत यांनी केलाय.

किरीट सोमय्यांचा थेट इशारा

सुजित पाटकर आणि तुमचा संबंध काय? उद्या संध्याकाळपर्यंत तुमचे उद्योगधंदे मान्य करा, अन्यथा उद्या चार वाजता पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशारा, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना दिला आहे. संजय राऊत, सुजित पाटकर, प्रवीण राऊत हे तिघे मिळून काय काय उद्योगधंदे करतात, ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर किरीट सोमय्या हळूहळू टप्प्याटप्प्याने मांडत आहे. उद्या संजय राऊत यांच्या अजून एका उद्योगधंद्याचा पर्दाफाश पुण्यात होणार आहे, असं सोमय्या यांनी म्हटलंय.

त्याचबरोबर प्रवीण राऊत आणि कंपनी कशाप्रकारे मदत करतात हे लोकांना कळू द्या. आतली गोष्ट काय आहे? कुणा कुणाला काय मिळालं आहे? आपल्याला अलिबागची जागा मिळाली की दादरचा फ्लॅट मिळाला? हे देखील एकदा सांगून टाका, असं थेट आव्हानच सोमय्या यांनी राऊतांना दिलं होतं.

गोव्यात भाजपच्या पायाखालची वाळू सरकली

गोव्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत तळ ठोकून बसले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या आणखी रंगत आली आहे. गोव्यात अजून प्रचाराचा पूर्ण रंग चढला नाही, हळू हळू रंग चढतोय, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. भाजपचे नेते अजूनही गोव्यात तळ ठोकून आहेत, त्यांना गरज आहे तळ ठोकण्याची, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.

राहुल गांधी यांच्या प्रचार सभाबाबत ऐकलं, गोव्यात शांततेत प्रचार होते असेही राऊत म्हणाले आहेत. शिवसेनेनेही गोव्याच्या प्रचारात जोर लावला आहे, आम्ही प्रथमच ११ जागा लढतोय अशी माहिती राऊतांनी दिली आहे. यापूर्वी दोन किंवा तीन जागा लढवत आलो. यावेळी राष्ट्रवादीशी आघाडी आहे. उत्पल यांच्यासाठी आम्ही जागा सोडली आहे. आम्ही खूप गांभीर्याने लढतो, आदित्य ठाकरे ११ आणि १२१ तारखेला येत आहे, अशी माहितीही राऊतांनी दिली आहे.

गोवा निवडणुकीत प्रचाराचा माहोल शिवसेनेने तयार केलाय. पणजीत भाजपचा उमेदवार पाडता यावा म्हणून शिवसेनेनी उमेदवारी दिली नाही, असेही राऊतांनी स्पष्ट केले आहे. तसेच शिवसेना पक्षाचा विस्तार व्हावा म्हणून आम्ही लढतोय, भाजपच्या पायाखालची जमीन सरकलीय, आमचा हेतू कुणाच्या सीट पाडण्यासाठी नाही, असेही राऊत म्हणाले. ओवीसींवर फायरिंग झाली त्यावरही राऊतांनी भाष्य केलं आहे. निवडणुकांमध्ये स्टंट म्हणावं का? हे मला कळत नाही, यूपीत त्यांच्या पक्षाची दखल कुणी घेत नाही. मात्र या हल्याचे उत्तर भाजपने द्यायला हवे कारण त्यांची तिथं त्यांची सत्ता आहे, असेही राऊत म्हणाले.

नितेश राणे यांच्याविरोधातली कारवाई कायद्याने

नितेश राणे यांच्याबद्दलची कारवाई सुड सुद्धीने नाही, कायद्यापुढे सर्व समान आहेत. मुख्यमत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती समान न्याय कायद्याच्या चौकटीत राहून काम करतात अशी प्रतिक्रिया राऊतांनी नितेश राणेंच्या अटकेवर दिली आहे. राणे सर्वाच्च न्यायालयापर्यत जाऊन आलेत, त्यामुळे राणेंनी सुडाचा आरोप करणे योग्य नाही. कायद्याच्या चौकशीला राणेंनी सामोरं गेलं पाहिजे, राणेंवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे, त्यांच्यावर म्यॉव म्यॉवचा गुन्हा दाखल नाही, असा खोचक टोला राऊतांनी लगावला आहे. तसेच कोण काय आमच्या विषयी बोलतं त्यावर आमच्या भमिका ठरत नाही. भाजप विरोधी पक्ष म्हणून अत्यंत खालच्या पद्धतीने टिकास्त्र करत आहेत, त्यांकडे आम्ही दुर्लक्ष करतो. अशा टीकेमुळे त्यांच्याच प्रतिमेला तडे जातात असेही राऊत म्हणाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button