आणीबाणी विषय कालबाह्य; संजय राऊत यांनी राहुल गांधींना फटकारले

मुंबई : आणीबाणी जाहीर करण्यात आपण चूक केली असा पश्चात्ताप मुळीच केला नाही. देशाला अराजकतेपासून वाचविण्यासाठी त्यावेळी आणीबाणी जाहीर करण्यावाचून गत्यंतर नव्हते या भूमिकेवर इंदिरा गांधी ठाम राहिल्या. आणीबाणी म्हणजे लोकशाही रुळावरून घसरली असे तिचे वर्णन खुद्द इंदिरा गांधींनीच केले होते. त्यानंतर आता आणीबाणी चुकीची होती अशी खंत आता राहुल गांधी यांनी व्यक्त केली. तशी गरज होती काय? आणीबाणी हा विषय कालबाहय़ झाला आहे. पुनः पुन्हा दळण का दळायचे?” अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोक या सदराच्या माध्यमातून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना फटकारले.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आणीबाणी चुकीची होती, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते. याच वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी वरील भाष्य केले. आणीबाणीचा विषय आता कालबाहय़ झालेला आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणीत निरपराध लोकांना जो त्रास झाला, कुटुंब नियोजनाच्या मोहिमेत लोकांना जो जुलूम सहन करावा लागला त्याबद्दल खेद प्रदर्शित केला. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप बसविण्यात चूक झाली असे जाहीरपणे कबूल केले आणि पुन्हा आणीबाणी आणणार नाही असे वचनही दिले होते, पण तरीसुद्धा त्यांनी अंतर्गत आणीबाणी जाहीर करण्यात आपण चूक केली असा पश्चात्ताप मुळीच केला नाही, असे संजय राऊत म्हणाले.
तसेच,
“देशाला अराजकतेपासून वाचविण्यासाठी त्यावेळी आणीबाणी जाहीर करण्यावाचून गत्यंतर नव्हते या भूमिकेवर त्या ठाम राहिल्या. आणीबाणी का आणावी लागली? आणीबाणी ही आदर्श स्थिती होती असा तिचा गौरव कोणीही केला नाही. आणीबाणी म्हणजे लोकशाही रुळावरून घसरली असे तिचे वर्णन खुद्द इंदिरा गांधींनीच केले होते. प्रक्षोभाचा डोंब उठून जेव्हा अराजक निर्माण झाले आणि तसा भयानक धोका निर्माण झाला, त्यावेळीच आणीबाणी जाहीर करण्यात आली. संप, बंद, घेराव यांनी त्या काळात उच्छाद मांडला होता. सर्वसामान्य जीवनाची अवस्था या ‘बंद’वाल्यांनी बिकट करून सोडली होती. राजकीय खून व स्फोट घडविले जात होते. हे राष्ट्रावरचे संकटच होते, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.
राऊत यांनी राहुल गांधी यांनी आणीबाणीविषयी माफी मागण्याचे कारण नव्हेत असं म्हटलंय. इंदिरा गांधी यांच्या पाठीशी प्रचंड बहुमत असूनही देशात राजकीय अस्थिरता वाढू लागली. त्यातून आणीबाणीचा भस्मासुर उदयास आला, पण पुन्हा आणीबाणी आणणार नाही या इंदिराजींच्या आश्वासनावर जनतेने विश्वास ठेवला व फक्त तीन वर्षांत पुन्हा त्यांना सत्तेवर आणले. म्हणजे जनतेने त्यांना माफच केले. मग राहुल गांधी यांना आजीच्या निर्णयाबद्दल माफी मागायचे कारण काय? आणीबाणी हा विषय कालबाहय़ झाला आहे. तो कायमचाच जमिनीखाली गाडला पाहिजे! असे संजय राऊत म्हणाले.
यावेळी त्यांनी रोखठोकमध्ये केंद्राच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले. सध्या देशाची परिस्थिती वाईट असल्याचं त्यांनी म्हटलंय. “भारतीय जनता पक्षाचे लोक आणीबाणीच्या नावाने आजही दळण दळत आहेत याचे आश्चर्य वाटते. तापसी पन्नू, अनुराग कश्यपसह चारजणांवर आयकर विभागाने छापे मारल्याचे वृत्त हा मजकूर लिहीत असताना आले. हे चौघे सतत देशातील सद्यस्थितीवर खुलेपणाने बोलत असतात. कदाचित टीकाही करीत असतात. आता या चारजणांवर इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या. म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतले हे चारजण सोडून बाकी सगळे ‘साव’ आहेत? आज देशाची परिस्थिती ‘आणीबाणी बरी होती’ असे म्हणावे अशीच आहे,” असं भाष्य राऊत यांनी केलंय.
दरम्यान राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरामध्ये शेवटी सध्याच्या मोदी सरकारच्या काळाची तुलना 1975 च्या आणीबाणीमधील वातावरणाशी केली आहे. “वृत्तपत्रांसह मीडिया हाऊसेसवर राजकीय नियंत्रण ठेवले जातेय. निवडणुका जिंकण्यासाठी, विरोधकांना खच्ची करण्यासाठी त्याच क्षुद्र कारवाया, तेच डावपेच आखले जात आहेत. घटनात्मक संकेत पायदळी तुडविण्याबाबत तोच उतावीळपणा दाखवला जोतोय. सर्व काही 1975 प्रमाणेच तर सुरू आहे. क्रांतीच्या नावाने तोच बेशरमपणा, दोन-चार लोकांभोवती गोंडे घोळणारी तीच लाचारी. त्या वातावरणात खरेच काही बदल झाला आहे काय? ‘इंदिरा इज इंडिया’ अशी घोषणा तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या देवकांत बरुआ यांनी केली. आज इंदिरा गांधींची जागा नरेंद्र मोदी यांनी घेतली. सरदार पटेल यांचे नाव बदलून एका भव्य स्टेडियमला मोदी यांचे नाव देण्यात आले, तेव्हा देवकांत बरुआ आजही जिवंत आहेत असे वाटले,” असे राऊत यांनी म्हटलंय.