‘महा कृषी ऊर्जा अभियान’ यशस्वी करण्यात महिलांची भूमिका महत्वाची : पुष्पा चव्हाण
मुंबई : महिलांनी कोणतेही काम प्रामाणिकपणे व चिकाटीने केल्यास यश हे मिळतेच. त्यामुळेच शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी सुमारे ६६ टक्के सूट देणारे ‘महा कृषी ऊर्जा अभियान’ यशस्वी करण्यात महावितरणच्या महिला कर्मचारी तसेच समाजातील सर्वच महिलांची भूमिका महत्वाची आहे. प्रत्येक महिलेने आपल्या संपर्कातील शेतकऱ्यांना या योजनेचे महत्व सांगून त्यांना या योजनेत सहभागी करून घ्यावे, असे आवाहन महावितरणच्या मुख्य अभियंता श्रीमती पुष्पा चव्हाण यांनी केले. त्या महावितरणच्या एचएसबीसी येथील कार्यालयात आयोजित महिला दिनाच्या निमित्ताने बोलत होत्या. यावेळी मुख्य अभियंता श्रीमती कविता घरत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्रीमती चव्हाण म्हणाल्या, प्रत्येक कुटुंबाचा आणि एकूण मानवी समाजाचा महिला या अविभाज्य भाग आहेत. चांगले शिक्षण घेतल्याने आज सर्वच क्षेत्रात महिला या पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. हे अत्यंत सकारात्मक चित्र आहे. या सर्व महिलांच्या निर्णयाचा व मतांचा अत्यंत सकारात्मक परिणाम त्यांच्या कुटुंबावर, समाजावर होत असतो. त्यामुळे शासनाची ही योजना यशस्वी करण्यात महिलांनीही आपला सक्रीय सहभाग नोंदवावा.
मुख्य अभियंता श्रीमती कविता घरत म्हणाल्या, महिलांना कार्यालय व कुटुंब अशा दोन जबाबदाऱ्या पार पाडावयाच्या असतात. त्यामुळे दोन्हीकडे आपले उत्कृष्ट योगदान देण्यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच ‘महा कृषी ऊर्जा अभियान’बाबत आपल्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीला या योजनेची माहिती देऊन लाभ घेण्यास प्रवृत्त करावे.
कार्यक्रमास आरती कुलकर्णी, पल्लवी शेरकर, प्रणाली निमजे, समीक्षा पाटील, भारती बांदेकर, वंदना वनगे, सुचिता साळुंखे यांच्यासह इतर महिला अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्योती पवार यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कार्यकारी अभियंता सलोनी वाकोडे यांनी केले.