मुक्तपीठ

समर्पण अन् समर्पण निधी

- पुरुषोत्तम आवारे-पाटील

आपल्या देशात विविध विषयांवर काम करणार्‍या खूप संघटना आणि लोक आहेत. समाज, पर्यावरण, धर्म, संस्कृती, अंधश्रद्धा निर्मूलन या संस्थांमध्ये वर्षानुवर्षे काम करणारे अनेक जण समर्पित आहेत. काही नावे अशी आहेत की ज्यांनी त्या विषयाला संपूर्ण आयुष्य वाहून टाकले आहे. समर्पण देण्यासाठी त्या त्या विषयाचा सखोल अभ्यास लागतो. त्यातूनच विषयाचे व्यापक स्वरूप लक्षात येते आणि समर्पणाची भावना तयार होते.

समर्पण म्हणजे निष्काम, निरपेक्ष भावनेने एखाद्या क्षेत्रात झोकून देणे, तेच काम आपल्या जगण्याचे ध्येय म्हणून स्वीकारणे, प्रसंगी त्यासाठी पदरमोड करणे, थोडक्यात त्या विषयाला तन, मन, धनाने मदत करणे असते. आजकाल एखाद्या आवडीच्या विषयावर काम करणार्‍याला समर्पित कार्यकर्ता म्हटले जाते हा भाग वेगळा. समर्पण भावनेने काम करणारी व्यक्ती बौद्धिक बाबतीत सक्षम असावी लागते. एखाद्या विषयाचे समाजात किती महत्त्व आहे, एखादा विचार देशातल्या लोकांसाठी कसा आवश्यक आहे हे तुमच्या मेंदूला पटल्याशिवाय त्या विषयावर काम करण्याची प्रेरणाच मिळत नाही.

धार्मिक विषयात जगभर समर्पण देणारे घटक इतर क्षेत्राच्या तुलनेत लवकर तयार होतात. धर्म आणि अध्यात्म ही बहुतांश माणसांची भावनिक गरज असल्यामुळे या क्षेत्राची व्यापकता आपल्या जगण्यात सर्वत्र दिसते. माणसाचा जन्म ते मृत्यू आणि त्यानंतरही आपल्या देशात धर्माची भूमिका सतत दिसते. त्यामुळे धर्म, अध्यात्म या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणार्‍यांना आपल्या देशात एक वेगळे स्थान आणि सन्मान प्राप्त होतो. *धर्म कार्याला वाहिलेली व्यक्ती कुणीतरी असाधारण आणि दैवी शक्ती प्राप्त करणारी असते असेच आपल्याला बालपणात सांगितले गेल्यामुळे अशी व्यक्ती दिसताच, संस्काराप्रमाणे दोन्ही हात जोडून अशांचे दर्शन घेण्याची परंपरा निर्माण झाली आहे*. मात्र त्याच भावनेने, तेवढ्याच त्यागाने इतर क्षेत्रात काम करणार्‍या लोकांच्या वाट्याला आपल्या देशात हा आदरभाव आला नाही. समर्पण या शब्दाचा प्रत्यक्ष संबंध आपल्या देशात दोन वर्गाचा अधिक येतो. संघ परिवार आणि डावी विचारसरणी असलेले घटक आणि त्यांचे समर्पण यावर कुणालाही शंका नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि डाव्या चळवळीचे कुणाला विचार, कार्य पद्धती कुणाला पटो वा ना पटो मात्र त्यांचे विचार, ध्येयाप्रती असणारे समर्पण, त्याग हे कुणी नाकारू शकणार नाही. याच भावनेने जगभरात मुस्लिम मूलतत्त्ववादी काम करताना दिसतात. या सगळ्या प्रक्रिया आपल्या मेंदूशी संबंधित असतात. शास्त्रीय परिभाषेत त्याला ‘ब्रेनवॉश’ असे म्हटले जाते. ब्रेनवॉश झाल्याशिवाय व्यक्ती एखाद्या कामात एवढी गर्क होऊ शकत नाही असे काहींना वाटते. आपल्या देशात गेल्या 50 वर्षात निर्माण झालेले जे अनेक धार्मिक पंथ आहेत, त्यातल्या अनेकात अशी मेंदू ताब्यात घेण्याची प्रकिया राबवली जात असते. त्यातून मरायलाही तयार होणारी जिहादी माणसं निर्माण केली जात आहेत. सनातन हे त्याचे उत्तम उदाहरण समजले जाते. समर्पण हा खरंतर सकारात्मक आणि जगाचे कल्याण करणारा शब्द आहे. त्याचे विविधांगी अर्थ काढणारे कलाकार, लोक काही वर्षात निर्माण झाले. त्यांनी स्वतःचे नवे तत्त्वज्ञान निर्माण करुन त्याचा देवाशी संबंध जोडायला सुरुवात केली आहे. अशा पंथांच्या दीक्षेला सुद्धा लाखो लोक बळी पडले आहेत. याउलट पुरोगामी, परिवर्तनवादी क्षेत्रात काम करणार्‍या विवेकी समूहात समर्पणाचा अभाव दिसतो. *विविध क्षेत्रातील मूलतत्त्ववादाच्या विरोधात बोलताना घशाला कोरड पडेल एवढी मेहनत पुरोगामी घेताना दिसतात. मात्र, प्रत्यक्ष वागताना समर्पण वगैरे त्यांनी खुंटीला टांगून ठेवलेले असते. समर्पण असेल तरच समर्पण निधी खिशातून आपोआप बाहेर काढला जातो. सध्या गोळा होेणार्‍या श्रीराम मंदिर समर्पण निधीवर वेडेवाकडे बोलणे सोपे आहे. परंतु हेच समर्पण एखाद्या पुरोगामी प्रकल्पासाठी देण्याची मोहीम सुरू झाली तर कथित पुरोगामी अन् विवेकी विद्वानांना असंख्य प्रापंचिक अडचणी आठवतात हे वास्तव आहे. *परिवर्तनवादी चळवळी, संस्था, दैनिके, व्यक्ती यांना मदत करण्याऐवजी उपदेशाचे डोस पाजण्याचे मोठे फॅड आपल्या देशात निर्माण झाले आहे*. उथळ आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले विचारवंत वैज्ञानिक दृष्टिकोन बाजूला ठेवून नव्या बंगल्याची वास्तुशांती करण्यावर लाखभर खर्च करतील. परंतु परिवर्तनवादी दैनिके, नियतकालिके यांना हजार रुपयांचीही जाहिरात देणार नाहीत आणि याच लोकांचे समर्पणावर आक्षेप घेणारे पानभर साहित्य छापावे, अशी अपेक्षा असते. जे इतरांचे समर्पण मान्य करतात, तेच स्वतः समर्पण पथावर चालण्याचा प्रयत्न करणारे असू शकतात यावर आमचा ठाम विश्वास आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button