
मुंबई : हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला आहे. अर्थात या प्रक्रियेत राज ठाकरे कुठेच नव्हते. पण आता राज ठाकरे यांनी पहिला प्रश्न उद्धव ठाकरे यांनाच विचारला पाहिजे, तुम्हीच मान्यता दिली आता कोणत्या तोंडाने विरोध करायला निघालात असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
या अधिवेशनात १२ विधेयके प्रस्तावित आहेत. जनसुरक्षेचे विधेयकाबाबत संयुक्त समितीने अहवाल दिला आहे. हे विधेयक या अधिवेशनात असेल. प्रचंड बहुमत असले तरी पळ काढणार नाही. विरोधी पक्षाने चर्चा करावी,त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यास तयार आहोत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
विरोधी पक्षाच्या पत्रात चोवीस चुका
विरोधी पक्षांनी जे पत्र सरकारला दिले आहे त्या पत्रात व्याकरणाच्या चोवीस चुका आहेत. मागच्या वेळी भास्कर जाधवांची सही होती पण ती यावेळच्या पत्रात दिसत नाही. विरोधकांनी दिलेले पत्र मोठे पण मजकूर मोठा नाही फक्त फॉन्ट मोठा केला असल्याचा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.
मीच उद्धव ठाकरेंचे आभार मानतो
हिंदीबाबतचा निर्णय घेतल्याने आम्ही भाऊ एकत्र येत आहोत त्याबद्दल मी मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानतो असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उदधव ठाकरेंनी ज्या प्रकारे मुख्यमंत्री म्हणून कारभार चालविला त्यामुळेच आमचे सरकार येऊ शकले, म्हणून मीच त्यांचे आभार मानतो. पण मराठी माणसाचा ते कैवार घेतात. पण पत्राचाळीतल्या मराठी माणसाचे काय,बीडीडी -अभ्युदय नगर,गिरगावातल्या मराठी माणसाचे काय. मुंबईतून जो मराठी माणूस सोडून गेला त्याला ते जबाबदार नाहीत काय. मराठी माणसाला घर देण्याचे काम आम्ही केले. मराठी माणसाचे नाव घ्यायचे आणि धन्नासेठच्या पाठिशी उभे राहायचे ही त्यांची निती आहे. मुंबई महापालिकेच्या मराठी शाळा बंद होउन त्या सीबीएसईकडे कशा गेल्या याची संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे योग्यवेळी ती माहिती बाहेर काढू असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया – एकनाथ शिंदे
आमच्यावर महाविकास आघाडीचे नेते भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. पण सध्या मुंबईत अनेक घोटाळयांची चौकशी सुरू आहे. खिचडी घोटाळा,बॉडीबॅग घोटाळा या कोविड काळातील घोटाळयांची चौकशी तर सुरूच आहे. पण मिठी नदी भ्रष्टाचाराची पण चौकशी सुरू आहे. त्यात दिनो मोरियाची पण चौकशी सुरू आहे. आता त्या दिनो मोरियाने जर तोंड उघडले तर कोणाचा मोरया होईल हे दिसणार आहे असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
निर्णय रद्द केले आता मोर्चाही रदद करा : अजित पवार
आम्ही हिंदीबाबतचे दोन्ही शासन निर्णय रदद केले आहेत. आता राज आणि उदधव ठाकरे यांना मोर्चा काढण्याचे कारणच उरलेले नाही. त्यामुळे मुंबईतील मराठी माणसाला वेठीस न धरता त्यांनी ५ तारखेचा हा मोर्चा रदद करावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. हा निर्णय रदद झाल्याने मराठी माणसानेही या मोर्चाला प्रतिसाद देउ नये असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ३६०० कोटी रूपये डीबीटीवर पाठविले आहेत. सोमवारी बहिणींच्या खात्यात पैसे मिळतील. अपवाद वगळता जून महिन्यात ब-यापैकी धरणे भरली आहेत. काही ठिकाणी नुकसान झाले आहे त्याचे रितसर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. हे सरकार कायम बळीराजाच्या पाठिशी उभे राहणार आहे.




