जशी करणी तशी भरणी हे ब्रिद काही वेळा तंतोतंत खरं होत,पण तोपर्यंतचा मधला काळ करणी करणारा तुरुंगवास टाळण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची पंचवीस लाखांची भरणी करतो हे जरा अजबच वाटत.तथापि हे सर्व घडलं असल्यानेच शिल्पा शेट्टीचा अवलिया नाही तर अवलादी उचापती पती साडेपाच महिने तुरुंगवास टाळण्यासाठी यशस्वी झाला .
अश्लील वेब सिरीज बनवण्याचे कसब लिलया पेलणाऱ्या राज कुंद्रा याच्या विरोधात चार फेब्रुवारीला मुंबईत दोन नवशिक्या अभिनेत्रींनी पोलिस तक्रार केली होती , यावेळी गुन्हे अन्वेषण विभागाने कुंद्रा सोडून इतर अकरा बिन्नीच्या आरोपींना अटक केली पण या टोळीचा म्होरक्या राज कुंद्राला पोलिसांनी अटक सोडा पण त्याची साधी चौकशी देखिल केली नाही .याला कारण तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख होते ॽ
देशमुखांच्या वतीने सचिन वाझे याने कुंद्राबरोबर या प्रकरणात सेटिंग करून पंचवीस लाख रुपयांचा मलिदा खाल्ला.प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने वाझेंने आपले हातपाय पसरत कुंद्राच्या मदतीने अशाच अश्लील वेब सिरीजच्या शेकडो निर्मात्यांकडून जवळपास पन्नास कोटी रुपयांचा मलिदा खाल्ला . यात एकता कपूर हिने सुध्दा आपला वाटा वाझे मार्फत देशमुखांपर्यंत कसा पोहोचेल याची व्यवस्था केली , या गोष्टींचा खुलासा करणारे पत्र कुंद्राचा सहाय्यक अरविंद श्रीवास्तव याने मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांना ई मेलने सहा फेब्रुवारीला पाठविले होते .या पत्रात श्रीवास्तव याने वाझेने आपणाकडे पंचवीस लाख रुपयांची मागणी केली असून जर पैसे दिले नाहीत तर तुरुंगवास अटळ असल्याचे धमकावले होते असा दावा केला होता .
परिणामी या पत्र्याची बोंबाबोंब झाल्याने श्रीवास्तवला पोलिसांनी अटक करून वेगळा संदेश देऊन मुंबई पोलिस भ्रष्टाचाराची नसल्याचे स्पष्ट करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. तो आता पुराव्यानिशी सिद्ध झालाय , कारण राज कुंद्राला अटक करण्यासाठी पोलिसांनी साडेपाच महिन्याचा कालावधी कशासाठी घेतला यांचे उत्तर फक्त खाबूगीरीच हे स्पष्ट होते.
परमवीर सिंग यांनी लेटर बाॅंब टाकून देशमुखांची मंत्रीपदावरून गच्छंती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली खरी पण त्यातून परमवीर हे काय धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होते असे सिद्ध झाले नाही किंवा होत नाही . भ्रष्टाचारच तळं राखतो तो पाणी चाखत नाही असं म्हणणं धाडसाचं होईल कारण देशमुखांच्या काळात पोलिस खात्यात जो काही कथित वारेमाप भ्रष्टाचार झाला त्यातून फक्त देशमुखांनी स्वतःचं घर भरलं असे होत नाही तर हा सगळा घटनाक्रम पाहता देशमुख, परमवीर, संबंधित त्या त्या विभागातील अधिकारी आणि म्होरक्या वाझे अशी ही चौकडी आहे .
अश्लील वेब सिरीज बनवण्याचा हा धंदा आजही बिनधास्त सुरू आहे ,राज कुंद्राची कंपनी सध्या पोलिसांच्या रडारवर आहे .याचा अर्थ एकता कपूरसह अन्य निर्माते नामानिराळे राहिलेत असा होत नाही , पोलिसांनी ठरवलं तर त्यांच्या हाती मोठं घबाड लागू शकत ॽ पण पोलिस याप्रकरणी किती खोदकाम करणार यावर सर्व अवलंबून आहे . कुंद्राबरोबर आता त्याची पत्नी शिल्पा शेट्टी कालपासून पोलिसांच्या रडारवर आहे , जाॅईंट पोलिस कमिशनर मिलिंद भारंबे यांच्या पथकाने काल शिल्पाच्या किराणा नामक बंगल्याची सहा तास झाडाझडती घेत या दाम्पत्याला समोर समोर बसवून उलट सुलट प्रश्र्नावर त्यांच्याकडून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला यात शिल्पाचा काही प्रमाणात सहभाग असल्याचे पोलिस सुत्रांचे मत आहे , येत्या चार दोन दिवसांत याचा खुलासा होऊ शकतो . वास्तविक हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कुंद्रावर कारवाई अपेक्षित होती पण वसूली सरकारने मलिदा खाल्ला आणि सगळा मामला अंधारात ठेवला ,मधल्या काळात परमवीर सिंग यांची आयुक्तपदावरून उचलबांगडी झाली तर लगोलग देशमुखांना मंत्रीपद गमवावे लागले म्हणून कुंद्राला अटक झाली अर्थात यामागे नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भूमिका महत्त्वाची आहे हे नाकारून चालणार नाही , वळसे-पाटील यांची आजपर्यंतची राजकीय कारकीर्द निर्विवाद अतिशय प्रामाणिक आहे हेही नमूद करावे लागेल .