स्पोर्ट्स

राहुल द्रविड होणार भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक

मुंबई : रवी शास्त्री यांच्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर कोण विराजमान होईल आणि कोण शर्यतीत आहेत, याचा फैसला आज होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं मुख्य प्रशिक्षकपदासह अनेक पदांसाठी अर्ज मागवले होते. त्यापैकी मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची आजची अंतिम तारीख होती. या पदासाठी माजी कर्णधार राहुल द्रविड याचे नाव आघाडीवर होते, परंतु कालच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यानं दिलेल्या विधानानंतर नेमकं काय चाललंय हेच कळत नव्हते.

राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक होणार हे मी वृत्तपत्रातूनच वाचतोय, असे विधान गांगुलीनं केलं होतं. पण, मंगळवारी राहुल द्रविडनं या पदासाठी अर्ज दाखल करून सर्व संभ्रम दूर केला आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड याचा एकमेव अर्ज आला आहे. त्यामुळे राहुलचेच मुख्य प्रशिक्षकपद होणे निश्चित मानले जात आहे. राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यास राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्षपद रिक्त होईल आणि त्या पदासाठी व्ही व्ही एस लक्ष्मण यानं अर्ज दाखल केला आहे.

द्रविडनं २०१५ ते २०१९ या कालावधीत भारत अ व १९ वर्षांखालील संघासोबत काम केलं आहे. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक युवा खेळाडूंनी राष्ट्रीय संघात आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली २०१८ साली १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button