शिक्षण

प्रॉससचा ‘प्रॉसस फ्लाइट’ शिक्षण आणि रोजगार उपक्रम

यूएन विमनच्या भागीदारीतून भारतातील वंचित महिला आणि मुलींना करणार साह्य

मुंबई: प्रॉसस, या नॅस्पर्सच्या जागतिक कन्झ्युमर इंटरनेट ग्रूपने आज भारतातील वंचित गटातील महिला आणि मुलींसाठी यूएन विमनच्या साथीने नवा उच्च शिक्षण आणि रोजगार उपक्रम सुरू करत असल्याची घोषणा केली.

मनुष्यबळात महिलांचा सहभाग आणि समानता वाढवून जीडीपीला चालना देण्याची सर्वाधिक संधी असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. यामुळे 2025 पर्यंत जीडीपी 770 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकेल. रोजगार असणाऱ्या कमावत्या वयातील पुरुषांचे प्रमाण 67 टक्के आहे. तर महिलांमध्ये हे प्रमाण फक्त 9 टक्के आहे. महिलांचा सहभाग कमी असण्यात गरिबी, शैक्षणिक संधींचा आणि रोल मॉडेल्सचा अभाव, लिंगभेदभाव आणि कमी वयात होणारे विवाह अशी मुख्य कारणे आहेत. माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेल्यांमध्येही बेरोजगार असण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक आहे. 2017-18 मध्ये 15 आणि त्यावरील वयोगटातील रोजगार असलेल्या महिलांचे एकूण प्रमाण २३.३ टक्के होते. ग्रामीण भागात हे प्रमाण 24.6 होते तर शहरी भागात तुलनेने कमी म्हणजे 20.4 टक्के इतके प्रमाण होते.

यातील काही अडथळे दूर करत 750 महिला आणि मुलींना योग्य पदवी किंवा प्रमाणपत्र शिक्षण घेण्यास तसेच त्यांचा रोजगारक्षम कौशल्ये प्राप्त करण्यात साह्य करण्याचे प्रॉसस फ्लाइटचे उद्दिष्ट आहे. यामुळे या महिलांना भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत सहभागी होता येईल.

मिडल, हायस्कूल किंवा सीनिअर सेकंडरी शिक्षण घेतलेल्या मात्र त्यापुढे शिक्षण घेण्याची संधी आणि/किंवा कौटुंबिक पाठिंबा मिळाला नाही अशा महिला आणि मुलींचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करणे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. महिला विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यात प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यात सामाजिक दृष्टिकोन आणि कौटुंबिक पाठबळ फार महत्त्वाचे असते. त्यामुळे या उपक्रमात काही विशिष्ट समुदायातील जवळपास 5000 कुटुंबांसाठी लिंग जागरुकता आणि संवेदनशीलता कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे स्त्रीशिक्षण आणि रोजगारासंदर्भातील दृष्टिकोनावर संशोधनही केले जाणार आहे.

या उपक्रमात भारतातील महाराष्ट्र राज्यातील 17 ते 25 या वयोगटातील तरुण महिलांवर भर देण्यात येणार आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र-मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आण रायगड या पाच जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात लक्ष्यित प्रयत्न आणि हस्तक्षेपाच्या माध्यमातून अशा तरुण पदवीधर मुलींचा समुह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे ज्या इतरांसाठी आदर्श ठरतील आणि स्थानिक समुदायांसाठी पाठबळ तयार करतील. यामुळे शिक्षण सोडणाऱ्या मुलींचे प्रमाण कमी करून त्यांना मिळणारे पाठबळ वाढवले जाईल.

फ्लाइट उपक्रमाद्वारे दिल्या जाणाऱ्या पाठबळात खालील बाबींचा समावेश आहे :
• सरकारी महाविद्यालये/आयटीआय/पॉलिटेक्निक अशा विविध संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी वार्षिक शिष्यवृत्ती देणे
• यूएन विमन्सच्या मार्गदर्शनानुसार तीन वर्षांसाठी आर्थिक साह्य देणे, यात विद्यार्थिनीलाही काही वाटा उचलावा लागेल.
• करिअर मार्गदर्शन आणि कौन्सिलिंगसोबतच सामाजिक साह्य उपलब्ध करून देणे आणि यातील प्रगतीशील मुलींना करिअर उभारण्यात साह्य करणे
• रोजगार मेळावे, इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देणे आणि खासगी कंपन्यांच्या भेटी घडवणे, त्याचप्रमाणे तज्ज्ञ आणि कॉर्पोरेट मेंटर्सची खास सत्रे
• सर्व करिअरमध्ये उपयोग पडेल असे व्यावसायिक, सॉफ्ट आणि लाईफ स्किल ट्रेनिंग
• प्लेसमेंट संधींची उपलब्धता, उद्योजकता किंवा स्वयंरोजगार करायचा असल्यास साह्य

या उपक्रमाबद्दल प्रॉससचे चीफ पीपल ऑफिसर आयलिन ओ टुली म्हणाले : “जगभरात महिलांसाठी समानतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षण ही गुरुकिल्ली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021 निमित्त यूएन विमनसोबत या उपक्रमाची घोषणा करताना मला आनंद होत आहे. यातून प्रतिभावान भारतीय महिलांना त्यांची शैक्षणिक स्वप्ने पूर्ण करण्यास आणि करिअरचा मार्ग आखण्यात साह्य होईल आणि त्यातून भारताच्या भवितव्यात त्यांचा सहभाग मिळेल.”

यूएन विमन इंडियाच्या प्रतिनिधी सुझॅन फर्ग्युसन म्हणाल्या : “जोवर तरुण महिलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध नसेल तोवर समाज आणि समुदाय प्रगती करू शकत नाही. शाश्वत विकासासाठी हा सर्वात शक्तिशाली आणि खात्रीशीर मार्ग आहे. तरुण महिलांच्या आर्थिक सक्षमता आणि कौशल्य विकासात गुंतवणूक ही अत्यंत तातडीची गरज आहे आणि लिंगसमानता, दारिद्र्य निर्मुलन आणि सर्वसमावेशक आर्थिक प्रगतीसाठीला चालना देणारा हा अत्यंत परिणामकारक मार्ग आहे. यूएन विमन आणि प्रॉससच्या भागीदारीतून फ्लाइट उपक्रम सुरू करण्यास मी अत्यंत उत्सुक आहे. हा उपक्रम शिक्षण घेण्यातील अडथळे दूर करून 750 महिला आणि मुलींना शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण घेण्यात साह्य करेल.”

तीन वर्षांच्या संशोधन भागीदारीला तातडीने सुरुवात केली जाणार आहे. याहसंदर्भातील माहिती वेळोवेळी यूएन विमन आणि प्रॉससच्या वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button