मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझेसोबत प्रदीप शर्माही मास्टरमाईंड; ‘एनआयए’चा दावा

मुंबई : एन्काऊंटर स्पेशलिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हा मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (‘एनआयए’) शर्मांसोबत अटक केलेल्या दोघा आरोपींनी यासंदर्भात दावा केला आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच आपण मनसुख हिरेनची हत्या केली, असा दावा सतीश आणि मनिष सोनी या आरोपींनी केल्याचं एनआयएच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. दरम्यान, लोणावळ्याच्या रिसॉर्टमधून ताब्यात घेतल्यानंतर जे जे रुग्णालयात शर्माची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर सेशन कोर्टात उभं करण्यात आलं. कोर्टाने त्याला २८ जूनपर्यंत ‘एनआयए’ कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलीस दलातील गटबाजीतून मला या प्रकरणात गोवण्यात आले आहे, असा आरोप प्रदीप शर्मा यांनी केला आहे.
एनआयएने प्रदीप शर्माच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली. अँटिलिया केस आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात छापेमारी सुरु होती. अखेर त्याला अटक करण्यात आली. मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करताना सचिन वाझे यांच्यासोबत सतीश, मनिष आणि प्रदीप शर्मा यांचा सहभाग स्पष्ट झाला. सतीश आणि मनिष यांनी मनसुख हिरेनची हत्या केल्याची कबुली दिली. सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच त्यांनी मनसुख हिरेनची हत्या केली. हत्येनंतर दोघांनी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्याशी संपर्क साधला होता. या हत्येसाठी दोघा आरोपींना रोख रक्कम देण्यात आली होती, असा दावा एनआयएच्या वकिलांनी केला आहे.
सतीश, मनीष, रियाझ काझी, सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन हत्येत सहभाग होता. सोबत संतोष शेलार आणि आनंद जाधव हेही होते. सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांनी कट रचून पुरावे नष्ट केले. हिरेनच्या हत्येनंतर सर्व आरोपी शर्मांच्या संपर्कात होते. मोठ्या प्रमाणात त्यांच्याजवळून पैसेही जप्त केले आहेत. प्रदीप शर्मा हे निवृत्त आहेत. त्यांच्या घरातून एक रिव्हॉल्वर मिळाली आहे. ज्याच्या लायसन्सची मुदत संपलेली आहे, असं वकिलांनी कोर्टात सांगितलं.




