सचिन वाझे, सुनील मानेसमाेर हाेणार प्रदीप शर्माची चाैकशी

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएने अटक केलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि इतर आरोपींचे डीएनए नमुने आज जमा करण्यात आले. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) असलेले पुरावे आणि आरोपींचे डीएनए टेस्ट करुन पाहिले जाणार आहेत.
कारमायकल रोड स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने अटक केलेल्या वादग्रस्त माजी पोलीस एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माकडे कसून चौकशी सुरू आहे. गुन्ह्यातील त्याचा सहभाग स्पष्ट झाला असून, या प्रकरणातील मुख्य संशयित सचिन वाझे व सुनील माने या खात्यातील बडतर्फ अधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे त्याच्यासमोर बसवूनही चौकशी केली जाणार असल्याचेही एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
एनआयएने गुरुवारी प्रदीप शर्मासह तिघांना अटक केली. हिरेनची हत्या करण्याचा कट त्याने वाझेसमवेत केला होता. संतोष शेलार, आशिष जाधव, सतीश मोठकरू व मनीष सोनी यांना हिरेनला मारण्याची सुपारी दिल्याचे त्याच्या जबाबातून स्पष्ट झाले. या तिघांना २८ जूनपर्यंत कोठडी मिळाल्याने त्याच्याकडून गुन्ह्याचा हेतू जाणून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शर्मा यातला मास्टरमाईंड नसला तरी त्याची भूमिका महत्त्वाची असल्याने मास्टरमाईंडपर्यंत पोहचण्यासाठी मदत होऊ शकते, त्यामुळे तपास यंत्रणा शनिवारपासून त्याच्याकडे कसून विचारणा करत आहे. न्यायालयीन कोठडीतील वाझे व सुनील माने यांना त्याच्या समोरासमोर बसवून विचारणा केली जाणार आहे.
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच आपण मनसुख हिरेनची हत्या केली, असा दावा अटकेत असलेल्या सतीश आणि मनिष सोनी या आरोपींनी केल्याचं एनआयएच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं होतं. त्यानंतर आणखी दोघा जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतल्याचं समोर आलं आहे. एनआयए प्रदीप शर्मांच्या निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्याच्याही मागावर असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा दावा केला जात आहे. गुरुवारीच शर्मांना एनआयएने अटक केली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करताना सचिन वाझे यांच्यासोबत सतीश, मनिष आणि प्रदीप शर्मा यांचा सहभाग स्पष्ट झाला. सतीश आणि मनिष यांनी मनसुख हिरेनची हत्या केल्याची कबुली दिली. सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच त्यांनी मनसुख हिरेनची हत्या केली. हत्येनंतर दोघांनी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्याशी संपर्क साधला होता. या हत्येसाठी दोघा आरोपींना रोख रक्कम देण्यात आली होती, असा दावा एनआयएच्या वकिलांनी कोर्टात केला.




