मुक्तपीठ

भारतात गलिच्छ राजकारणाचा उदय !

- हर्षल प्रधान

कोरोनाची दुसरी लाट पुन्हा जबरदस्त पद्धतीने येताना दिसत आहे. ट्रेन सुरु करा, मंदिर सुरु करा, अमुक सुरु करा, तमुक सुरु करा. नाहीतर आंदोलन करू, ठिय्या करू सरकार विरोधात बोंब मारू. भाजपने ही गोष्ट करून करून नियंत्रणात आणलेल्या कोरोनाला वाढीस लावण्यासाठी खतपाणी घातले. आज महाराष्ट्रात कोरोनाचे दरदिवशी ३५ -४० हजारांच्या घरात रुग्ण सापडत आहेत. आता घेणार का याची जवाबदारी भाजप ? सत्तापिपासू असणाऱ्या भाजपने सत्ता गेल्यावर अक्षरशः बाजार मांडला. सकाळी सोमैय्या, दुपारी शेलार, संध्याकाळी राणे, रात्री फडणवीस यांच्या पत्रकार परिषदांनी अक्षरशः सरकारसह जनतेला त्रास देण्याचे काम केले. कोरोना काळात स्वतःचा निधी महाराष्ट्राच्या सीएम फंडालाला न देता, पीएम फंडाला देऊन महाराष्ट्रद्रोह तर केलाच. पण त्याचवेळी कोरोना काळात राजकीय मतभेद विसरून एकत्र येण्याचे सोडून उलट महाराष्ट्र राज्याच्या बदनामीचे धिंडवडे देशभर काढत सुटले.

उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाचा अनुभव नसताना ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली. लोकांना धीर दिला, परिस्थितीचा वेध घेऊन टप्प्या टप्प्याने सर्वात अगोदर लॉकडाऊन केला, राज्यात कोरोनासाठी इतकी मोठी हॉस्पिटलची यंत्रणा उभी केली. एक जवाबदार मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे, त्यापेक्षा अधिक कार्य नवनिर्वाचित असतांना केले. बोंबा-बोम्ब करणे आणि कामं करणे यात जमीन अस्मानाचा फरक असतो. उद्धव अत्यंत शांत पद्धतीने एक एक पाऊल अगदी योग्य टाकत गेले. आज जर फडणवीस मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राची बजबजपुरी झाली असती.

एकीकडे उद्धव एक एक पाऊल उचलत होते तर भाजपवाले टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, काळोख करा, दिवे लावा अशी बालिश कामं करून जनतेला मूर्ख बनवत होते. खरं तर सत्ता गेली हे भाजपला सहनच नाही झालंय. पचनी पडायलाच तय्यार नाही आणि त्या वैफल्यग्रस्त भावनेतून महाराष्ट्र सरकारला लक्ष करायचे प्रयत्न सुरु आहेत. सुरवातीला सुशांत सिंग प्रकरणात सरकारवर आणि मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढले. नंतर सी.बी.आय. चौकशी लावली. मग आता काय झाले त्या सी.बी.आयच्या चौकशी अहवालाचे ? त्या अहवालात स्पष्ट्पणे सीबीआयने म्हटले आहे की, यात कुठेही सुशांतचा खून झाला असा सूक्ष्म बिंदू देखील नसून ती आत्महत्या आहे. यामुळे सणसणीत चपराक बसणाऱ्या भाजपने तो सी.बी.आय चा अहवाल आजपर्यंत दाबून ठेवला.

झी न्यूज, रिपब्लिक भारत, इंडिया टीवी, आज तक सारखे विकत घेतलेली मीडिया हाताशी धरून हि मीडिया भाजपची अक्षरशः लाळ गळेपर्यंत चाटत आहे. जो विरोधात बोलणार त्यावर इ.डी, सी.बी.आय, सी.आय.डी, इन्कम टॅक्स सारखी यंत्रणा लावून तोंड बंद करायची कामं सुरु आहेत. सत्तेचा हा अफाट दुरुपयोग करून भाजप देशाचे राजकारण खराब करत आहे. काही मुद्दा नाही मिळाला तर हिंदू मुसलमान वाद उकरून काढायचा, सोशल मीडिया मध्ये असे मेसेज पसरावायचे कि हिंदू मुसलमान यांच्यात द्वेषाची भावना तयार होईल. म्हणजे भाजपला ध्रुवीकरण करून मतांचे राजकारण करायला बरे.

जे हैदराबादचे एम.आय.एम चे ओवेसी हिंदूंच्या विरोधात गरळ ओकतात आणि त्यांना भाजपवाले टीव्हीवर विरोधात बोलतात. त्या ओवेसीच्या अत्यंत मर्जीतल्या जवळच्या असणाऱ्या कंपन्यांन कडे केंद्र सरकारची तब्बल १४ हजार कोटींची टेंडर आहेत. आता विचार करा यांचे काय लागेबांधे आहेत ते. ओवेसींना सांगायचे हिंदूंना शिव्या घाल, आम्ही तुला शिव्या घालतो. म्हणजे अल्पसंख्यांक मुसलमान तुला मतदान करतील आणि बहुसंख्य हिंदू भाजपला मतदान करतील. यामुळे काँग्रेसची व्होटबँक असणारी अल्पसंख्यांक मतं त्यांना नं मिळत तुला मिळून, तुझ्या थोड्या जागा निवडून येतील आणि बहुसंख्यांक हिंदूंची मतं घेऊन आम्ही निवडून येऊ. अत्यंत गलिछ राजकारण करून सध्या भाजप देशाचा सत्यानाश तर करत आहेच, पण विरोधी पक्ष संपवून टाकून लोकशाहीचा खून करत आहे. सत्ता जेव्हा डोक्यात जाते तेव्हा जी बेधुंद अवस्था होते आणि मस्तवालपणा येतो तो आज भाजपामध्ये आणि त्यांच्या नेत्यांमध्ये निर्माण झालाय.

भाजपने या भारतात गलिच्छ राजकारणाचा उदय जरी केला असला तरी, हे सर्व फार काळ टिकत नसते. पण लोकांना समज येईपर्यंत देश अदानी-अंबानीच्या हातात जाऊन देशाची संपत्ती विकून खासगीकरण होऊ नये म्हणजे झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button