
खरं म्हणजे चौदा विद्या आणि चौसष्ट कला सर्वांनाच माहीत असतात ,पण तेव्हढ्यावर समाधान मानेल तो माणूस कसला ? काहींना आपले कर्तव्य म्हणून, तर काहींना पोटभरण्यासाठी म्हणून, तर अजून काहींना आपल्याकडे नसलेल्या बुद्धीचं प्रदर्शन मांडून प्रसिद्धी मिळविण्यासाठी एका कलेचा उपयोग करावा लागतो ; ती म्हणजे ‘उचलेगिरी’ !
आता कर्तव्य म्हणून ‘ उचलेगिरी’ करावी लागते ती पोलिसांना ! ते काय बिचारे हुकुमाचे ताबेदार . करूणानिधींची सत्ता असतांना त्यांनी हुकूम दिला की जयललितांना ‘ उचलायचं’ आणि जयलालितांची सत्ता आल्यावर त्यांनी हुकूम दिला की करूणानिधींना ‘उचलायचं’ ! आणीबाणीत नाही का, मॅडमच्या एका आदेशाने त्यांनी देशभरातले विरोधक रात्रीतून बरोबर ‘ उचलले’ होते ! हा सगळा इतिहास झाला. आताचं सांगायचं तर सचिन वाझेंनी ( त्यांचा एकेरीत उल्लेख करून कसं चालेल ? किंबहुना तसं करताच येणार नाही आणि करूही नाही. का म्हणून करावा त्यांचा एकेरी उल्लेख ?त्यांचा एकेरी उल्लेख करायला ते काय ओसामा बिन लादेन आहेत की काय ?) अर्णव गोस्वामीला त्याच्या घरी जाऊन कसा स्टाईलमध्ये ‘ उचलला’ होता आणि तळोजा जेलमध्ये नेऊन टाकला होता !अर्थात नंतर सीबीआयनेही त्यांना ‘उचललं’ आणि त्याच तळोजा जेलमध्ये नेऊन टाकलं हा भाग निराळा . आताच एक ताजी ताजी ‘उचलेगिरी’ गाजली ती एका फार्मा कंपनीच्या मालकाची ! कायद्याला लांबलचक ‘वळसे’ घालत पोलिसांना एका फार्मा कंपनीच्या मालकाला ‘ उचलण्याचा’ हुकूम सुटला आणि हुकुमाचे ताबेदार असलेल्या पोलिसांनी असाच रात्रीच्या वेळी त्याला ‘उचलला’ ! त्याला ‘उचलल्या’ची खबर लागताच विरोधी पक्षनेते, जे आधी त्या फार्मा कंपनीच्या मालकाकडे, ‘ मैं तेरे दर पे आया हूं , कुछ कर के जाऊंगा , झोली भर के जाऊंगा या मर के जाऊंगा ‘ म्हणत गेले होते, ते मध्यरात्री तेच गाणं म्हणत पोलिसस्टेशनमध्ये पोहचले आणि पोलिसांनीही त्यांचा रुद्रावतार पाहून तो फार्मा मालक अलगदपणे त्यांच्या झोळीत टाकला !
‘ उचलेगिरी’ करणारा दुसरा वर्ग म्हणजे पोटभरण्यासाठी ‘ उचलेगिरी’ करणारा . कष्ट करून पोट भरण्याची ज्यांची लायकी नाही आणि मोठी चोरी करण्याइतकी बुद्धी आणि हिंमत ज्यांच्यापाशी नाही, ते पोटभरण्यासाठी ‘ उचलेगिरी’ करतात . अशी ‘ उचलेगिरी’ करणारे एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, बाजार अशा ठिकाणी आपलं सावज हेरत फिरत असतात. त्यांच्याबद्दल जास्त काय लिहिणार ?
उचलेगिरी’ करणारा अजून एक वर्ग आहे. या वर्गाकडेही बुद्धी आणि हिमतीची ; वरच्या ‘उचलेगिरी’ करणाऱ्या वर्गाइतकीच किंबहुना त्याहूनही जास्त वानवा असते. हे ‘ उचले’ वर्तमानपत्रातून , मासिकातून आपलं सावज हेरत असतात. वर्तमानपत्रातल्या एखाद्या लेखातून नेमक्या वाचकलक्षवेधी शब्दांची , वाक्यांची ‘ उचलेगिरी’ करण्यात यांचा हातखंडा असतो. हेे ‘उचलेेे’ बालबुद्धीचे असल्यामुळे ज्या मासिकातून, वर्तमानपत्रातून आपण ‘ उचलेगिरी’ केली आहे तिथेच ती खपवू नये हे सुद्धा यांच्या लक्षात येत नाही. म्हणजे, जर आपण एखाद्याचे कपडे चोरले असतील तर तेच कपडे घालून त्याच्या दारावरून जाऊ नये, इतकीही अक्कल यांना नसते .यांना आपल्या नसलेल्या अकलेचं प्रदर्शन मांडण्याची भलतीच हौस असते. त्यासाठी ते एखाद्या वर्तमानपत्रात, मासिकात आपला लेख प्रसिद्ध व्हावा म्हणून सतत धडपड करीत असतात. यांच्या प्रयत्नांना यश आलं की मात्र यांना काही म्हणता काही सुचत नाही. ‘ आडताच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार’ या विचारानेच यांना कापरं भरतं . अशा वेळी मग यांना ‘ उचलेगिरी’ ची सवय कामी येते. कोणी आपली ‘उचलेगिरी’ लक्षात आणून दिली तरी माफी मागण्याइतकंही औदार्य यांच्याकडे नसतं. अर्थात चोरी पकडली गेली म्हणून कोणा चोराने ‘ सॉरी’ म्हटल्याचं अजूनतरी आपण ऐकलेलं नसल्यामुळे अशा ‘ उचल्यां’कडून कसली अपेक्षा करणार ? लग्न मंडपाच्या बाहेर नाही का उष्ट्या पत्रावळी उचलणारे फिरत ? आपण आपल्या ताटाकडे लक्ष द्यावं, यथेच्छ मेजवानी झोडावी . उष्ट्या पत्रावळींची ‘ उचलेगिरी’ करणाऱ्या भिकाऱ्यांकडे लक्ष देऊ नये , हेच उत्तम !
(लेखकाचा संपर्क : ७८७८० ७७७२८)




