Top Newsराजकारण

एकच आघाडी असेल तरच भाजपला पर्याय देणे शक्य, नेतृत्वाचा निर्णय नंतर !

संजय राऊतांची राहुल गांधींसोबत चर्चा

नवी दिल्ली: देशात एकच आघाडी असेल तरच पर्याय देणे शक्य होईल. तीन चार आघाड्या निर्माण केल्याने भाजपला पर्याय दिला जाऊ शकणार नाही, असं सांगतानाच काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी होऊच शकत नाही. या आघाडीच्या नेतृत्वाचं नंतर ठरेल. पण आघाडी एकच असेल, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर राऊत यांनी मीडियाशी संवाद साधत काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी अस्तित्वात येऊच शकत नसल्याचं म्हटलं आहे. नवी आघाडी झाली तरी काँग्रेसच्या नेतृत्वातही एखादी आघाडी काम करेलच. काँग्रेससोबत अनेक पक्ष आहेत. ते काँग्रेसच्या नेतृत्वात जातील. त्यामुळे तीन तीन फ्रंट हवेत कशाला? काय करणार एवढे फ्रंट करून? अशाने भाजपला आपण पर्याय देऊ शकणार नाही, असं राऊत यांनी सांगितलं. विरोधकांची एक बैठक बोलावण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कामी तुम्ही पुढाकार घ्यावा अशी विनंती मी राहुल गांधींना केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

आजच्या बैठकीत केवळ उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीवरच नाही तर राष्ट्रीय राजकारणावरही चर्चा झाली. आघाडीचं नेतृत्व कुणी करावं याबाबत मी बोलत नाही. मला वाटतं एकच फ्रंट असावा. एकच फ्रंट बनेल. एकच फ्रंट बनायला हवा. एकच फ्रंट बनला तरच आपण पर्याय देू शकतो. आम्ही सर्व एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली. दीर्घ चर्चा झाली. राजकीय चर्चा झाली. या भेटीतील संदेशच सांगायचा झाला तर सबकुछ ठिक है, हाच आमचा संदेश आहे, असं सांगतानाच राहुल गांधी यांच्याशी काय चर्चा झाली हे मी माझ्या पक्षप्रमुखांना सांगेल. आदित्य ठाकरेंना सांगेन. नंतर तुमच्याशी बोलेल असं राऊत म्हणाले.

या बैठकीत सर्व विरोधकांना एकत्र ठेवण्यावर चर्चा झाली. या विषयावर सर्वांनी चर्चा केली पाहिजे. विरोधकांचा एकच फ्रंट व्हायला हवा. काँग्रेसला वगळून कोणताही फ्रंट शक्य नाही. हे आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे. त्यावर चर्चा झाली. राहुल गांधी लवकरच मुंबईत येणार आहेत. त्यांचा एक कार्यक्रम आहे. त्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामाला सुरुवात केली असेल तर त्यांची आणि राहुल गांधींची भेट होईल, असंही त्यांनी सांगितलं.

तृणमूल आणि काँग्रेसला एकत्र आणण्यासाठी शिवसेना मध्यस्थी करणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावेळी तृणमूल आणि काँग्रेसला एकत्र आणण्यासाठी शरद पवार पुरेसे आहेत. ते मजबूत नेते आहेत, असं त्यांनी सांगितलं. तसेच उद्या प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

शिवसेना यूपीएत असणार का? पुढील २४ तासांत सांगणार

राऊत आणि राहुल गांधी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएमध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न विचारला जातोय. मात्र, राहुल गांधी यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी बोलून आणि त्यांनी परवानगी दिली तर मी तुम्हाला माहिती देईल, असं सूचक वक्तव्य राऊत यांनी दिलं आहे. काही वेळ वेणुगोपालही चर्चेत सहभागी झाले होते. या भेटीत देशपातळीवर अनेक मुद्दे, पाच राज्यातील विधानसभा निवडणुका आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली, असं संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button