Top Newsआरोग्य

लोकल प्रवासासाठी पहिल्या दिवशी १७,७५८ जणांनी काढला पास

मुंबई : दोन डोस घेतलेल्या नागरिकांचे ओळखपत्र तपासून त्यांना मासिक पास देण्याची कार्यवाही बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्याच दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत १८ हजारांहून अधिक नागरिकांची पडताळणी पूर्ण झाली. तर पहिल्या सत्रात रेल्वे प्रशासनाद्वारे १७ हजार ७५८ मासिक पासांचे वितरण करण्यात आले.

मुंबईतील सर्वसामान्‍य नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करण्‍यास मुभा देण्यात आली आहे. यानुसार ५३ रेल्‍वे स्‍थानकांवर ३५८ मदत कक्ष सुरू करण्‍यात आले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी प्रत्यक्ष रेल्वे स्थानकांवर भेटी देऊन या प्रक्रियेची पाहणी केली, तसेच ऑफलाइन पडताळणी करताना रेल्वे प्रवासी आणि मदत कक्षावरील कार्यरत कर्मचारी यांना कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही, या दृष्टीने काळजी घेण्याचा सल्ला महापौरांनी यावेळी दिला.

पहिल्या दिवशी १७ हजार ७५८ मासिक पास देण्यात आले आहेत. यामध्ये मध्य रेल्वेद्वारे १२ हजार ७७१, तर पश्चिम रेल्वेद्वारे देण्यात आलेल्या चार हजार ९८७ मासिक पासांचा समावेश आहे. दररोज सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सलग दोन सत्रामध्‍ये मदत कक्ष कार्यरत असणार आहेत. यामुळे विनाकारण गर्दी न करता नागरिकांनी आपल्‍या घराजवळील रेल्‍वे स्‍थानकांवर पडताळणीकरिता जावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

दम्यान, लोकलच्या प्रवासासाठी १५ ऑगस्टपासून देण्यात येणाऱ्या पाससाठी कोरोना लसीकरणाची पडताळणी केली जात आहे. पण, आरोग्य सेतूवर माहिती उपलब्ध असताना पडताळणीचा घाट का, असा सवाल प्रवासी विचारत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button