स्पोर्ट्स

कुस्तीपटू सुशील कुमारच्या विरोधात पोलिसांची लूकआऊट नोटीस

नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी सोमवारी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या वादावादीनंतर हाणामारीत झालेल्या पैलवानाच्या मृत्यू प्रकरणी सुशील कुमारचा पोलीस शोध घेत आहेत. सुशील कुमारशिवाय २० अन्य आरोपींचाही पोलिसांना शोध आहे. दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर पैलवानांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत २३ वर्षीय सागर राणाचा मृत्यू झाला होता.

मॉडेल टाऊन परिसरातील फ्लॅट रिकामा करण्यावरुन पैलवानांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. सागर राणा हत्या प्रकरणात सुशील कुमारचेही नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिल्ली एनसीआरसोबतच शेजारी राज्यांमध्येही छापेमारी करुन सुशील कुमारचा शोध घेतला जात आहे.
मयत पैलवान सागर राणा हा आपल्या मित्रांसोबत छत्रसाल स्टेडियमजवळील मॉडेल टाऊन परिसरातील एका घरात राहत होता. ही जागा रिकामी करण्यावरुन गेल्या मंगळवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये तुफान हाणामारी आणि गोळीबारही झाल्याचा आरोप आहे. यावेळी सुशील कुमारही उपस्थित असल्याचा दावा पीडितांनी केला आहे. जखमी पैलवानांपैकी सागर राणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर इतर काही जण जखमी आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरुन स्कॉर्पिओ कार आणि बंदूक मिळाली आहे. त्यासोबतच पोलिसांनी जिवंत काडतुसंही जप्त केली आहेत. याआधीही पैलवानांच्या गटात प्रॉपर्टीवरुन वाद झाल्याची माहिती आहे.

ते आमचे पैलवान नव्हते, मंगळवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. आम्ही पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे की काही अनोळखी व्यक्तींनी आमच्या आवारात उडी मारुन भांडण केले. आमच्या स्टेडियमचा या घटनेशी काही संबंध नाही, असा दावा कुस्तीपटू सुशील कुमार याने पाच मे रोजी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना केला होता. त्यानंतर सुशील कुमारशी संपर्क झालेला नाही.

सुशील कुमार हा भारताकडून दोन वेळा वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारा एकमेव अ‍ॅथलीट आहे. ३७ वर्षीय सुशील कुमारने २०२१२ च्या लंडन ऑलिम्पिक्समध्ये रौप्य, तर २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिक्समध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. २००८ मध्ये सुशील कुमारने जिंकलेलं पदक हे खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक्समध्ये कुस्ती प्रकारात भारताने पटकवलेलं दुसरं पदक होतं. त्याला २००९ मध्ये राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च क्रीडा सन्मानाने गौरवण्यात आलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button