राजकारण

ओबीसी आरक्षण : बारामतीत २९ जुलैला एल्गार महामोर्चाचे आयोजन

बारामती: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या चांगलेच वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या खडाजंगी सुरु आहे. याच दरम्यान ओबीसी आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलनाची पहिली ठिणगी बारामतीत पडणार आहे. याबाबत नुकतीच महाराष्ट्र राज्य ओबीसी आरक्षण कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे.

बारामतीमध्ये येत्या २९ जुलैला पक्ष विरहित एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांना देखील निमंत्रण देण्यात येणार आहे, अशी माहिती ओबीसी आरक्षण कृती समितीच्या वतीने देण्यात आली. बारामती येथे ओबीसी आरक्षण कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी एल्गार मोर्चाची घोषणा करण्यात आली.

यावेळी कृती समितीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ओबीसी चे राजकीय अतिरिक्त आरक्षण अवैध ठरल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे अतिरिक्त आरक्षण रद्द केले आहे. परिणामी याचं आरक्षणाच्या धर्तीवर १९९५ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. परंतू, आता येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये होणाऱ्या निवडणुकामध्ये ओबीसी प्रवर्ग रद्द करूनच निवडणुका होतील. त्यामुळे ओबीसीच्या राजकीय हक्कावर गदा येणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ज्या अटी आणि शर्थी पूर्ण गठन ५० टक्के आरक्षणाला संमती दर्शवली आहे. मात्र, राज्य आणि केंद्र सरकार ओबीसींच्या आरक्षणाकडे गांभीर्याने पाहत नाही. म्हणून राज्य आणि केंद्र सरकारला जागे करण्यासाठी राज्यात एल्गार महामोचार्चे आयोजन करण्यात येणार आहे. त्याची सुरवात बारामतीपासून केली जाणार आहे.

या एल्गार महामोर्चामध्ये ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या सर्व जातींचा समावेश असणार आहे. या साठी पुणे जिल्ह्यात गावोगावी घोंगडी बैठक, छोट्या मोठ्या सभा, फेसबुक, व्हाटस् च्या अँप माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. बारामतीमध्ये होणारा हा मोर्चा राजकीय पक्ष विरहीत मोर्चा असणार आहे. या मोचार्ला राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या ओबीसी नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. यामध्ये महादेव जानकर, छगन भुजबळ, एकनाथ खडसे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, संजय राऊत, या प्रमुख व इतर नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button