सिंधुदुर्ग : आज भाजपचे अध्यक्ष -उपाध्यक्ष ११ विरुद्ध ७ मतांनी विजयी झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने अनेक मोठमोठी लोक आली, अक्कल सांगायला लागली होती, त्यांना आज अक्कल आली असेल. असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला मारत यापुढे जिल्हा बँकेचा कारभार शेतकरी, गोरगरीब, मजूर, युवा वर्ग, बेरोजगार यांच्यासाठी असणार असल्याचे मत केंद्रीय सूक्ष्म,लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.
भाजप प्रणीत पैनल चे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जनतेच्या हिताचे काम करतील. आजपर्यंत सर्व निवडणुका माझ्या नेतृत्वाखाली झाल्या त्यात सर्व अध्यक्षांनी चांगले काम केले, मात्र एक अपशकुन झाला, एक गद्दार निघाला. त्याला आज बँकेतून पळवून लावले आहे. तो जिल्हात उघड मानेने फिरू शकत नाही अशी त्याची अवस्था झालेली आहे, अशी टीका नारायण राणे यांनी माजी जिल्हा बँकेचे मावळते अध्यक्ष सतीश सावंत यांचे नाव न घेता केली.
गोर गरिबांच्या हितासाठी मी जिल्हा बँक यापूर्वी निवडणून आणली होती आणि त्यावर अंकुश ठेवला होता. गद्दार लोकांनी जिल्हा बँकेची बदनामी केली, मात्र भाजपकडून असे काम होणार नाही. जनतेच्या हितासाठी काम केले जाईल. आपल्याच लोकांची बदनामी केली जात होती. शैक्षणिक संस्थेसाठी आम्ही कर्ज काढले आहे. वर्षाला सात ते आठ कोटी रुपये व्याज भरतो, त्यामुळे आमची बदनामी करण्याचे काम काही लोकांनी केले अशी टीका नारायण राणे यांनी केली.
जिल्हा बँकेतून महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोटो गायब
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भाजपची सत्ता येताच महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो गायब झाले आहेत. अध्यक्ष दालनातील बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे फोटो काढून टाकण्यात आले आहेत. अध्यक्षांच्या खुर्चीमागील भिंतीवर गेल्या कित्येक दिवसांपासून गणपतीच्या फोटो बरोबर हे तीन फोटो होते, मात्र कालपासून हे फोटो या भिंतीवरून गायब झाल्याची चर्चा होती. आता फक्त गणपती आणि नारायण राणे असे दोनच फोटो आहेत. जिल्ह्यात आज दिवसभर या फोटोंचीच चर्चा रंगली होती.