राज्यात आता ऑक्सिजन फक्त रुग्णांसाठीच!
मुंबई : राज्यात आता 100 टक्के ऑक्सिजन हा फक्त वैद्यकीय वापरासाठी देण्याचे आदेश कंपन्यांना दिले जाणार असल्याची माहिती शिंगणे यांनी दिलीय. ऑक्सिजनच्या निर्मितीला वेळ आणि मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागतं. येत्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्य राज्यातून ऑक्सिजन मिळवण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरु असल्याची माहितीही शिंगणे यांनी दिली.
सध्या 80 टक्के ऑक्सिजन हा वैद्यकीय वापरासाठी तर 20 टक्के हा उद्योगांसाठी देण्याचे आदेश कंपन्यांना दिले होते. पण त्यात आता लवकरच बदल केला जाणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विविध उद्योगांना केला जाणारा ऑक्सिजन पुरवठा आता थांबवला जाणार आहे. फक्त वैद्यकीय गरजेसाठीच ऑक्सिजन उत्पादन केलं जाणार आहे. राजेंद्र शिंगणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गेल्य काही दिवसांत राज्यात काही भागात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. राज्यात ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या अने कंपन्या असल्या तरी 7 ते 8 कंपन्यांमध्येच मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचं उत्पादन घेतलं जातं. त्या कंपन्यांना टँकर्स आणि वाहतुकीबाबत सर्व मदत सरकारकडून दिली जात आहे. राज्यात 12 हजार 87 मेट्रिक टन ऑक्सिजनचं उप्तादन घेतलं जातं. आता रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ऑक्सिजनची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढतेय. अशावेळी मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगडमधून ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे’.