Top Newsराजकारण

देशात कोणीही सुरक्षित नाही; पेगासस प्रकरणावरून संजय राऊतांचा हल्लाबोल

नवी दिल्ली: पेगासस प्रकरणावरून शिवसेना अधिकच आक्रमक झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. आजही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत सरकारवर हल्ला चढवला. पेगासस प्रकरण उघड झाल्याने देशात कोणीही सुरक्षित नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आपल्यावर पाळत ठेवली जात आहे असं या देशातील नागरिकांना वाटतं. अधिकारी, राजकारणी, पत्रकार आणि इतर कोणी असतील त्या प्रत्येकावर पाळत ठेवली जात आहे. त्यांची हेरगिरी केली जात आहे. हे काल स्पष्ट झालं आहे, असं राऊत म्हणाले.

पेगासस प्रकरणाचा जो भांडाफोड झाला आहे. हा देशाशी धोका आहे. देशातील जनतेशी धोका आहे. ही हेरगिरीच नाही तर विश्वासघातही आहे, असं सांगतानाच आम्ही या मुद्द्यावर संसंदेत आवाज उठवू. हिंमत असेल तर सरकारने आमच्याशी या मुद्द्यावर चर्चा करावी, असं आव्हानच राऊत यांनी दिलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधींपासून अनेक पत्रकार आणि निवडणूक आयोगाचे माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. लवासा यांनी 2019मध्ये मोदींनी आचारसंहितेचा भंग केल्याचं मत व्यक्त केलं होतं. असं सांगण्याची हिंमत करणारे ते एकमेव निवडणूक आयुक्त होते. त्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. माजी मुख्य न्यायाधीशावर आरोप झाला होता. त्यातील महिला फिर्यादीवर पाळत ठेवली जात होती, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

दोन केंद्रीय मंत्र्यांवरही पाळत ठेवली. केंद्रातील नवे रेल्वे राज्यमंत्री अश्विनी वैष्णव आणि प्रल्हाद जोशी यांचीही हेरगिरी केली गेली. हे धक्कादायक आहे. त्यांच्यावर का पाळत ठेवली? कशासाठी पाळत ठेवली माहीत नाही. वैष्णव आधी मंत्री नव्हते. ते आता मंत्री झाले. मग त्यांच्यावर का पाळत ठेवली होती. याचा खुलासा झाला पाहिजे. विशेष म्हणजे ते याच खात्याचे मंत्री आहेत. आधी पाळत ठेवली. आता त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. हे का केलं? हे देशाला समजलं पाहिजे. हा गंभीर मुद्दा आहे, असं ते म्हणाले.

फोन टॅपिंग हा राजयीक मुद्दा आहे. तो प्रायव्हसीचाही मुद्दा आहे. सरकार फोन टॅपिंग का आणि कशासाठी करत आहे हे मला कळत नाही. आम्ही महाराष्ट्रात सरकार बनवत असताना आमचेही फोन टॅप करण्यात आले. उद्धव ठाकरेंपासून माझेही फोन टॅप केले. नाना पटोले यांचेही फोन टॅप झाले. सरकार बनविण्याच्या प्रक्रियेत असलेल्या सर्वांचे फोन टॅप केले जात होते. आमचे फोन टॅप करण्यासाठी मोठमोठ्या एजन्सी कामाला लावल्या होत्या. तरीही आम्ही सरकार स्थापन केलं. बंगालमध्येही फोन टॅप केले. तरीही सरकार बनलं. आम्ही घाबरत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

…तर भाजपने तांडव केलं असतं

संपूर्ण देश चिंतीत आहे. देशाला धक्का बसला आहे. या देशात कोणीच सुरक्षित नाही असं वाटतं. कोणी आमचा फोन ऐकतोय. कोणी आमचा पाठलाग करत आहे. कोणी आमच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे हे संपूर्ण प्रकरण देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेशी संबधित आहे. आज दुसरं कुठलं सरकार असतं यूपीएचं सरकार असतं भाजप विरोधात असतं तर त्यांची काय भूमिका असती. त्यांनी संपूर्ण देशात हंगामा केला असता. देशात तांडव केलं असतं. आज ते आम्हाला ग्यान शिकवत आहेत, असा टोला लगावतानाच भाजपने या मुद्द्यावर सभागृहाचं काम चालू दिलं नसतं. जेपीसीची मागणी केली असती. आम्हीही जेपीसीच्या चौकशीची मागणी करत आहोत. परंतु पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी देशाच्या समोर येऊन सत्य सांगावं. हे संपूर्ण प्रकरण इस्रायलच्या कंपनीशी संबंधित आहे. मोदींच्या कार्यकाळातच इस्रायलशी आपले चांगले संबंध झाले आहेत. पूर्वीही होते आज चांगले झाले आहे. पण हा देशाशी धोका आहे. देशातील जनतेशी धोका आहे. ही हेरगिरीच नाही तर विश्वासघातही आहे, असं ते म्हणाले.

आज काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंच्या केबिनमध्ये या विषयावर बैठक होणार आहे. त्यानुसार आम्ही रणनीती ठरवणार आहोत. ही एका पक्षाची रणनीती असू शकत नाही. विरोधी पक्षांची म्हणून रणनीती असेल. या संकटाशी सर्वांनी मिळून लढलं पाहिजे. हा विश्वासघात आहे. त्याच्याशी लढलं पाहिजे. सभागृहात आम्ही आंदोलन करणार आहोत. संसद ही देशाचं सर्वोच्च स्थान आहे. तिथेच सरकारला उत्तरं मागणार. सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन चर्चा करावी, असं आव्हानही त्यांनी दिलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button